बिस्कीट उद्योगाला मंदीची झळ

Parle-Biscuit
Parle-Biscuit

मुंबई - बिस्किटांचा खप कमी झाल्याने उत्पादक कंपन्यांना मंदीची झळ बसू लागली आहे. आघाडीची बिस्कीट उत्पादक असलेल्या ‘पारले प्रॉडक्‍ट्‌स‘ने सुमारे दहा हजार कर्मचारी कपातीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, बिस्कीट उद्योगातील मंदीवर पारले आणि ब्रिटानिया दोन बड्या उत्पादक कंपन्यांनी चिंता व्यक्त केली असून, वस्तू आणि सेवा कराबाबत (जीएसटी) फेरविचार करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

‘पारले प्रॉडक्‍ट्‌स’चे विभागप्रमुख मयांक शहा म्हणाले, ‘‘जीएसटीमुळे बिस्कीट उद्योगाच्या अडचणीत वाढ झाली आहे. यातच मंदीने बिस्किटांची मागणी कमी झाली असून, कर्मचारी कपातीशिवाय पर्याय उरलेला नाही. पारले समूहाच्या दहा उत्पादन प्रकल्पांत सुमारे एक लाख कर्मचारी आहेत. विक्रीमध्ये सातत्याने घसरण होत असल्याने कंपनीसमोरील अडचण वाढली आहे. पारलेची जवळपास निम्मी विक्री ग्रामीण बाजारपेठेत होते. मात्र सर्वच बाजारांमधून बिस्किटाची मागणी कमी झाल्याने खर्च कमी करण्यासाठी नजीकच्या काळात किमान ८ ते १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करावी लागेल.’’ पाच रुपये किमतीच्या बिस्किटांवरील वस्तू आणि सेवा कर १८ टक्‍के असून, तो कमी करण्याची मागणी सरकारकडे केल्याचे शहा यांनी नमूद केले. 

ब्रिटानियाचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी म्हणाले, ‘‘पाच रुपयांचे बिस्कीट खरेदी करण्यास ग्राहक दोनदा विचार करत आहेत. बिस्किटांची मागणी कमी झाल्याने मंदीचा प्रभाव वाढत असल्याचे अधोरेखित होते. गेल्या वर्षी ब्रिटानियाच्या विक्रीत केवळ ६ टक्के वाढ झाली. याच कालावधीत बाजाराची वाढ त्याहून कमी प्रमाणात झाली आहे.’’  

चहा उद्योगही संकटात
हवामानातील बदल, उत्पादन खर्चातील वाढ, निर्यातीतील घसरण, मागणीच्या तुलनेत अतिरिक्त पुरवठा आणि स्थिर भावामुळे चहा उद्योग संकटात सापडला आहे. चहा उत्पादकांची शिखर संघटना असलेल्या ‘इंडियन टी असोसिएशन’ने चहा उद्योगाला स्थैर्य आणण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची मागणी केली आहे. चहाच्या मळ्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्या किमान वेतनात २२ टक्के वाढ झाली आहे. यामुळे चहा उत्पादकांचा खर्च वाढला आहे. चहाच्या मागणीच्या तुलनेत प्रचंड पुरवठा होत असल्याने भावामध्ये फारशी वाढ झालेली नाही. यामुळे नजीकच्या काळात चहा उद्योग मोठ्या संकटात सापडेल, अशी भीती ‘इंडियन टी असोसिएशन’चे सचिव अभिजित शर्मा यांनी व्यक्त केली. चहा उद्योगात १२ लाख मनुष्यबळ कार्यरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com