पारनेर : तहसीलदार ज्योती देवरे चौकशीत दोषी; तात्काळ बदली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Talatha's complaint against Tehsildar Jyoti Deore

पारनेर : तहसीलदार ज्योती देवरे चौकशीत दोषी; तात्काळ बदली

पारनेर : लोकसेवकपदाचा गैरवापर केल्याचा आरोप असलेल्या पारनेरच्या (जि. नगर) तहसीलदार ज्योती देवरे या चौकशीत दोषी ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पण देवरे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Jyoti Deore transfer

Jyoti Deore transfer

पदाचा गैरवापर करून वाळूमाफियांना परस्पर कारवाईमुक्त करणे, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी आणि पोकलेन मशिन जप्त केल्यानंतर तडजोड शुल्क सरकारला जमा न करता परस्पर मुक्त करणे असे विविध आरोप तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर आहेत. अशा विविध प्रकारे देवरे यांनी ५ कोटी ९४ लाख ९६ हजार ७२ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार राज्याच्या लोकायुक्तांकडे ३० ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा: 'पेंग्विन' परग्रहावरुन आलेत?; जाणून घ्या का सुरु आहे चर्चा?

यासंदर्भात आलेल्या शासनाच्या आदेशात म्हटलंय की, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी राज्य महिला आयोग, नाशिकचे विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश विभागीय आयुक्तांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने ज्योती देवरे यांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करुन त्याचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात ज्योती देवरे यांच्या तक्रारीत कोणतही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. तसेच ज्योती देवरे यांनी कामात गंभीर स्वरुपाची अनियमितता केली, अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. चौकशीदरम्यान देवरे यांनी माध्यमांमध्ये भाष्य करुन शासनाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.

हेही वाचा: अलिबाग पोलिसांसमोर नारायण राणेंची हजेरी; म्हणाले...

दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणाने त्यांची बदली करण्यात आली असून जळगाव जिल्ह्यातील संगायो येथील तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तात्काळ प्रभावाने त्यांची बदली करण्यात आली असून नियुक्तीच्या ठिकाणीही त्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना कुठल्याही प्रकारची रजा मंजूर न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Web Title: Parner Tehsildar Jyoti Deore Convicted In Interrogation Transfer On Immidiate Effect

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Maharashtra News