Shiv Sena : 'धनुष्यबाण चोरीतल्या 'त्या' संशयित चोराची माहिती लवकरच देणार' राऊतांचं स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut News

Shiv Sena : 'धनुष्यबाण चोरीतल्या 'त्या' संशयित चोराची माहिती लवकरच देणार' राऊतांचं स्पष्टीकरण

मुंबईः शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह हातचं गेल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. आज दिवसभर राज्यात ठाकरे गटाचे शिवसैनिक संतप्त झाले होते. आता संजय राऊत यांनी याबाबत एक स्पष्टीकरण दिलं आहे.

माध्यमांशी बोलतांना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत म्हणाले की, आमचा धनुष्यबाण चोरीला गेला आहे. या चोरीची आम्ही कसून चौकशी करीत आहोत. एवढंच नाही तर तो संशयित चोर कोण आणि त्याला कुठल्या महाशक्तीची मदत झाली, हेसुद्धा आम्ही स्पष्ट करणार आहोत असं राऊत म्हणाले.

काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. त्यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच संतप्त झाले. 'निवडणूक आयुक्तांना शेणच खायचं होतं तर त्यांनी एवढी खटाटोप का करायला लावला. आम्ही त्यांनी सांगितलेल्या फॉरमॅटमध्ये कागदपत्रं दिली होती. तरीही त्यांनी जे करायचं तेच केलं' असं म्हणत चोरांच्या टोळीने धनुष्यबाण चोरल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

आज संजय राऊत बोलतांना म्हणाले की, शिवसेना पक्ष हा सामान्य पक्ष नसून मर्दांचा पक्ष आहे. आमचा पक्ष सत्तेत आल्यावाचून राहणार नाही. धनुष्यबाणाच्या चोरीसाठी ज्या महाशक्तीने मदत केली आहे, त्याचाही तपास आम्ही करणार आहोत.

काय म्हणाले संजय राऊत?

 • आमच्या धनुष्यबाणाची चोरी झाली आहे

 • या चोरीची आम्ही कसून चौकशी करु आणि चोरांच्या म्होरक्याचा शोध घेऊ

 • धनुष्यबाण चोरलेल्यांची वस्त्रहरण लवकरच करणार आहोत

 • चोरांच्या सरदारांचा आम्ही शोध घेणार आहोत

 • धनुष्यबाणाच्या निर्णयानंतर भाजपचे लोक आनंद व्यक्त करीत आहेत

 • बाळासाहेबांचा चेहरा वापरुन तुम्हाला मतं मागावी लागणार आहेत

 • ह्या चोरीसाठी दिल्लीतल्या महाशक्तीने काय मदत केली, याचा तपास आम्ही करणार आहोत

 • यातला संशयित चोर कोण आहे, याची माहिती जनतेला देणार आहोत

 • शिवसेना सामान्य पक्ष नाही, मर्दांचा पक्ष आहे

 • हा पक्ष पुढे जाईल आणि सत्तेतही येईल

 • या चोरांना रस्त्यावर अडवून लोक जाब विचारणार