पवार-ठाकरे यांची भेट विमानात...

पवार-ठाकरे यांची भेट विमानात...

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही आज औरंगाबादेत होते. विशेष म्हणजे ज्या हॉटेलात शरद पवारांची पत्रकार परिषद झाली, त्याच हॉटेलमध्ये राज ठाकरे देखील थांबले होते. पत्रकार परिषदेपूर्वीच या दोन नेत्यांमध्ये भेट आणि चर्चा होणार होती. पण पत्रकार परिषद लांबल्यामुळे आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाची वेळ जवळ आल्याने ती हुकली. मात्र हॉटेलात हुकलेली पवार-ठाकरे भेट अखेर विमानात झालीच. हे दोघेही सायंकाळी एकाच विमानाने मुंबईला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. 

शरद पवार बुधवारी सायंकाळी बुलडाणा जिल्ह्यातील एका खाजगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शहरात दाखल झाले होते. हॉटेलात मुक्काम केल्यावर ते सकाळी नियोजित कार्यक्रमाला जाऊन पुन्हा दुपारी चार वाजता औरंगाबादेतील हॉटेलात परतले. तर गेल्या दहा दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील आज दुपारी याच हॉटेलात थांबले होते.

आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत दुपारचे जेवण घेतल्यानंतर राज ठाकरे आणि शरद पवार यांची भेट आणि गुप्त बैठक होणार होती अशी चर्चा होती. त्यासाठी राज ठाकरे यांच्या सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना हॉटेलच्या लॉबीत, लॉन किंवा रेस्टॉरंट यापैकी कुठेही बसा पण रुमजवळ थांबू नका अशा सूचना देण्यात आल्या होत्या. दुपारी सव्वाचार वाजता शरद पवार यांचे हॉटेलमध्ये आगमन झाले. पत्रकार परिषदेची वेळ साडेचारची असल्याने ते थेट पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आले. तासभर पत्रकार परिषद चालल्यामुळे आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाची वेळ होत असल्यामुळे राज ठाकरे चिकलठाणा विमानतळावर निघून गेले. त्यानंतर पत्रकार परिषद संपताच शरद पवार देखील विमानतळावर पोहचले.

विशेष म्हणजे हे दोघेही एकाच विमानातून मुंबईला गेल्यामुळे हॉटेलात हुकलेली दोन मोठ्या नेत्यांची भेट विमानात झाल्याची चर्चा रंगली होती. राज्य व केंद्रातील सरकार विरोधी पक्षांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून केला जात आहे. राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी व इतर समविचारी पक्षांच्या आघाडीत मनसेचाही समावेश करावा असे प्रयत्न देखील शरद पवारांकडून सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर पवार-ठाकरे यांच्या एकत्रित विमान प्रवासाने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

आणखी वाचा -

आघाडीत मनसेला घेण्यासाठी हालचाली; राष्ट्रवादी अनुकुल

https://www.esakal.com/pune/congress-ncp-alliance-has-begun-take-part-mns-151140

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com