कोरेगाव भीमा येथे मानवंदनेसाठी जनसागर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमाजवळ पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून अनेक मान्यवरांसह आलेल्या आंबेडकरी बांधवांनी मंगळवारी दिवसभर अलोट गर्दी केली होती. विविध पक्ष, संघटनांनी अभिवादन सभा घेऊन विजयस्तंभास मानवंदना दिली.

कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमाजवळ पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून अनेक मान्यवरांसह आलेल्या आंबेडकरी बांधवांनी मंगळवारी दिवसभर अलोट गर्दी केली होती. विविध पक्ष, संघटनांनी अभिवादन सभा घेऊन विजयस्तंभास मानवंदना दिली.

समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी सात वाजताच कार्यकर्त्यांसह विजयस्तंभस्थळी भेट देऊन अभिवादन केले. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन सेना तसेच भारतीय बौद्ध महासभेचे भीमराज आंबेडकर, मीराताई आंबेडकर यांनी अभिवादन करून सभा घेतल्या. या वेळी समता सैनिक दलाचे सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. अभिवादनासाठी माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे, खासदार अमर साबळे, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या नेत्यांनी विजयस्तंभस्थळी भेट देऊन अभिवादन केले. श्री क्षेत्र वढू येथेही दिवसभर अभिवादन कार्यक्रम शांततेत सुरू होता. श्री क्षेत्र तुळापूर येथेही अनेकांनी भेट दिली.

स्थानिकांकडून स्वागत
पेरणे, कोरेगाव भीमा, सणसवाडी, लोणीकंद, अष्टापूर फाटा येथे स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने फूल, पाणी तसेच नाश्‍ता, जेवण देऊन स्वागत करण्यात आले.  कोरेगाव भीमा येथेही ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने फूल, पाणी देऊन स्वागत करण्यात आले. 

पोलिसांनी विजयस्तंभस्थळी गर्दी एकवटू दिली नाही. पुणे व नगर बाजूकडून येणाऱ्या बांधवांसाठी तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना स्वतंत्र मार्गिका केल्यामुळे विजयस्तंभ प्रवेशस्थळी गर्दी न होता नियोजनबद्ध पद्धतीने अभिवादन सुरू होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांचे बंदोबस्तावर लक्ष होते. 

पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘‘दंगलीनंतर स्थानिक ग्रामस्थांची शांततेची ग्वाही, त्यांचा मान सरकारने राखला नाही. ज्यांनी समन्वयाची भूमिका घेतली, त्यांनाच सरकारने नोटिसा पाठविल्या. मात्र, ज्यांनी दंगली घडविल्या, त्या संभाजी भिडेसारख्या नेत्यांना सरकारने अद्याप नोटिसा दिलेली नाही.’’

‘परिसर विकासासाठी १०० कोटींची मागणी’
येत्या काळात विजयस्तंभ स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व परिसराच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली.

आठवले म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी विजयस्तंभस्थळी मानवंदनेसाठी येणाऱ्यांचे स्थानिकांकडून स्वागत, ही आनंदाची बाब आहे. पोलिस व प्रशासनानेही उत्तम व्यवस्था केल्यामुळे १० ते १५ लाखांचा जनसमुदाय येऊनही कार्यक्रम शांततेत पार पडला. मात्र, येत्या काळात या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व त्यासाठी १०० कोटींची मागणी केली आहे.’’

तीर्थक्षेत्र जाहीर करावे : आनंदराज आंबेडकर
रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर सहा किलोमीटर चालत विजयस्तंभ स्थळी अभिवादनासाठी पोचले. ते म्हणाले, ‘‘गतवर्षाच्या घटनेनंतर आंबेडकरी समाज पेटून उठल्याने यावर्षी दुपटीने उपस्थिती वाढली आहे. दरवर्षी ही गर्दी वाढतच जाणार आहे. त्यामुळे सरकारने हे स्थळ तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करून वाढीव सुविधा द्याव्यात.’’ रोहित वेमुला याची आई राधिका वेमुला यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केले.

सर्व समाज घटकांनी दिलेली साथ व सहकार्यामुळेच आजच्या अभिवादन कार्यक्रमाचे सर्व नियोजन यशस्वी झाले.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी 

Web Title: people visit vijaystambh of koregaon bhima anniversary