राज्यातील पोलिसांची कामगिरी सुमार 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 डिसेंबर 2018

मुंबई : राज्यातील गुन्हेगारी घटल्याचे सांगून दोषसिद्धीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करणारे फडणवीस सरकार केंद्र सरकारच्या अहवालामुळे तोंडघशी पडले आहे. केंद्र सरकारने देशभरातील टॉपटेन पोलिस ठाण्यांची यादी जाहीर केली असून, यात महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आला आहे, तर राजस्थानातील बिकानेरच्या कालू पोलिस ठाण्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. 

वर्षभर उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशभरातील दहा पोलिस स्थानकांची नावे केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केली आहेत. राजस्थानमधील कालू बिकानेर पोलिस स्टेशन यादीत अव्वल असून, महाराष्ट्रातील एकाही पोलिस ठाण्याला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवता आलेले नाही. पहिल्या स्थानावर राजस्थानमधील कालू बिकानेर, दुसऱ्या क्रमांकावर अंदमान निकोबारमधील कॅम्पबेल बे, तर तिसऱ्या स्थानी पश्‍चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील फरक्का पोलिस स्टेशन आहे. 

गुजरातमध्ये सुरू असलेल्या डीजीपी- आयजीपी कॉन्फरन्सला 20 डिसेंबरपासून सुरवात झाली. या वेळी गृह मंत्रालयाकडून 2018 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या देशभरातील दहा पोलिस ठाण्यांचा गौरव करण्यात आला. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या तिन्ही पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. 

मुंबई पोलिसही मागे 

खेदाची बाब म्हणजे उत्तम कामगिरी बजावणाऱ्या या दहा पोलिस स्टेशन्सच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलिस स्थानकाचा समावेश नाही. खरे तर महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची तत्परताही फेसबुक आणि ट्‌विटरवर पाहायला मिळते; मात्र प्रत्यक्षात त्यांची कामगिरी टॉप 10 ला साजेशी नसल्याचे केंद्र सरकारनेच दाखवून दिले आहे. 

उत्तम कामगिरी बजावणारी पोलिस ठाणी 

1. कालू (बिकानेर, राजस्थान) 
2. कॅम्पबेल बे (अंदमान- निकोबार) 
3. फरक्का (मुर्शिदाबाद, पश्‍चिम बंगाल) 
4. नेत्तापक्कम (पुदुच्चेरी) 
5. गुदेरी (कर्नाटक) 
6. चोपाल (हिमाचल प्रदेश) 
7. लाखेरी (राजस्थान) 
8. पेरियाकुलम (तमिळनाडू) 
9. मुन्स्यारी (उत्तराखंड) 
10. कुडचरे (गोवा) 

Web Title: The performance of police in the state is moderate