पेट्रोल-डिझेलवरील अधिभार कमी करा - राधाकृष्ण विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

शिर्डी - राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल विक्रीतून लिटरमागे केंद्र सरकार 22 रुपये, तर राज्य सरकार तब्बल 29 रुपये कमाविते. केंद्र सरकारने उत्पादन शुल्क व राज्य सरकारने मूल्यवर्धित कर कमी करून सामान्य जनतेस दिलासा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

पत्रात म्हटले आहे, की काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत बॅलरमागे 109 वरून 45 रुपयांपर्यंत घसरण झाली होती. त्यावेळीही केंद्र व राज्य सरकारने हे कर कमी केले नव्हते. आता सध्याच्या दरवाढीमुळे जनतेची होरपळ सुरू आहे. केंद्र सरकार याबाबत गंभीर नाही. केंद्रीय अर्थ मंत्रालयानेही मूल्यवर्धित कर कमी करण्याचे आवाहन राज्य सरकारांना केले आहे. सध्या पेट्रोल-डिझेलचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यातून महागाईचा भडका उडणार आहे. सामान्य जनतेची ससेहोलपट कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी विखे पाटील यांनी पत्रात केली आहे.

Web Title: petro diesel overload decrease radhakrishna vikhe patil