पेट्रोल-डिझेल दरांत कपात करा ! -  राधाकृष्ण विखे पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 एप्रिल 2018

मुंबई - 'पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यातील नागरिक महागाईने होरपळून निघाला आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटर 82 रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. वाढत्या महागाईने संपूर्ण देशातील जनता त्रस्त झाली असून, किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात, तर राज्य सरकारने मूल्यवर्धित करात कपात करावी,'' अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या पेट्रोल विक्रीतून उत्पादन शुल्काच्या रूपात केंद्र सरकार प्रतिलीटर साधारणतः 22 रुपये, तर मूल्यवर्धीत करांच्या रूपात राज्य सरकार प्रतिलिटर सुमारे 29 रुपये कमावते आहे. डिझेल विक्रीतूनही साधारणतः याच प्रमाणात करवसुली केली जात आहे. केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर लागू करताना "एक देश, एक कर' अशी संकल्पना मांडली होती. परंतु, पेट्रोल व डिझेलचा वस्तू व सेवा करात अंतर्भाव न झाल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना प्रत्येक लिटरच्या खरेदीमागे केंद्र व राज्य सरकार मिळून सुमारे 60 टक्के कर भरावा लागतो आहे. त्यामुळे सरकारने तातडीने कर कपात करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

Web Title: petrol diesel rate radhakrishna vikhe patil