पेट्रोलपंपांवरील पंतप्रधानांचे फलक काढण्याची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मुंबई - विधान परिषद निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. विरोधी पक्षांच्या फलकांप्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपांवर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक, तसेच इतर सरकारी जाहिरातींचे फलक तत्काळ काढावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस प्रदेश समितीचे सरचिटणीस आणि प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्तांकडे सोमवारी केली.

निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निडणुकीच्या घोषणेनंतर निवडणूक होणाऱ्या औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण आणि नाशिक या पाच विभागांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने विविध राजकीय पक्षांचे परवानग्या घेऊन लावलेले फलक काढले आहेत.

आचारसंहितेनुसार फलक काढण्यावर कुणाचाही आक्षेप नाही; पण या नियमानुसार सर्वच राजकीय फलक निवडणूक आयोगाने काढणे अपेक्षित आहे; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक या पाचही विभागांतील सर्व पेट्रोलपंपांवर लावलेले आहेत. सर्व राजकीय पक्षांसाठी एकच नियम आहेत. या नियमानुसार प्रशासनाने विरोधी पक्षांच्या नेत्यांचे सर्व फलक काढले आहेत; पण सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातींचे फलक या पाचही विभागांमधील पेट्रोलपंपांवर लावलेले आहेत, ते तत्काळ काढून घ्यावेत, असे सावंत म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol pump demand the removal of the panel to the prime minister