पेट्रोल पंप रविवारीदेखील सुरू राहणार - पालकमंत्री बापट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

पुणे - 'सर्वसामान्य नागरिकांना त्रास न देण्यासाठी पेट्रोल पंप सुरू ठेवा, अन्यथा "मेस्मा' कायद्याची अंमलबजावणी करू', असा इशारा दिल्यानंतर रविवारी पेट्रोल पंप बंद न ठेवण्याचा निर्णय पेट्रोल डीलर्स असोसिएशनने घेतला आहे, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज (ता. 13) पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे राज्यभरातील पेट्रोल पंप उद्याही (रविवारी) सुरू राहणार आहेत.

राज्य पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या विविध मागण्यांवर शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या वेळी नियोजित पेट्रोल पंप बंदचा निर्णय मागे घेण्यात आला. या निर्णयावर बापट म्हणाले, 'शहर आणि जिल्ह्यातील वाहनांची संख्या लाखोंच्या घरात आहे. रविवारी पेट्रोल विक्री बंद राहिल्यास दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होईल. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाल्यास "मेस्मा' कायद्याची अंमलबजावणी करू, असा इशारा दिल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. येत्या 17 मे रोजी पेट्रोलियम कंपन्या आणि वितरकांची बैठक मुंबई येथे होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या मध्यस्थीने केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा करू. तूर्त तरी रविवारी पेट्रोल पंप बंदचा निर्णय रद्द झाला आहे.''

यावर पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष, राज्य प्रवक्ते सागर रुकारी म्हणाले, 'केंद्र सरकारच्या अपूर्वा चंद्रा समितीच्या अहवालानुसार दर सहा महिन्यांनी कमिशन वाढवून देणे अपेक्षित आहे. त्यानुसार फक्त एकदाच कमिशन वाढवून मिळाले आहे. सध्या प्रतिलिटर पेट्रोल विक्रीमागे दोन रुपये 48 पैसे, तर डिझेल विक्रीमागे एक रुपया 60 पैसे मिळतात. या संदर्भात मुंबईतील बैठकीत निर्णय होणार आहे. त्यामुळे राज्यभरात रविवारी पेट्रोल पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.''

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील सचिव अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय समितीचा अहवाल 2011 मध्ये देण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी 2013 पासून करण्यात आली. त्या शिफारशीनुसार दर सहा महिन्यांनी राज्यभरातील पेट्रोल पंपचालकांना पेट्रोल आणि डिझेल विक्रीमध्ये प्रतिलिटर कमिशन वाढवून देण्याचे नमूद केले होते.

Web Title: petrol pump open at sunday