राज्यातील पेट्रोल पंप आज सुरू राहणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

पुणे - कमिशनवाढ आणि सुटीच्या मागणीसाठी पेट्रोलपंप चालकांनी उद्या (रविवारी) पुकारलेला संप मागे घेतला आहे. संप केल्यास "मेस्मा' कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर पंपचालकांनी संप मागे घेतला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी येथे दिली. वाहनधारकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, याची काळजी घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

कमिशन वाढवणे आणि सुटीच्या मागणीसाठी पंपचालकांनी संपाचे हत्यार उपसले होते. त्यानुसार उद्या (रविवारी) पेट्रोल आणि डिझेलची विक्री बंद ठेवण्यात येणार होती. सुटीच्या दिवशी वाहनधारकांची गैरसोय होणार होती. पेट्रोल पंपचालकांनी संपाचा इशारा दिल्यानंतर आज पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात पेट्रोल आणि डिझेल डीलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर रुकारी यांनी उद्या पुकारण्यात आलेला संप मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. येत्या 17 मे रोजी होणाऱ्या बैठकीत राज्य सरकार यासंबंधी निर्णय घेणार असल्याने संप तूर्तास मागे घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Web Title: petrol pump start today