सरकारी कार्यालयातच प्लॅस्टिकचा वापर

सरकारी कार्यालयातच प्लॅस्टिकचा वापर

पुणे - राज्यात प्लॅस्टिक बंदीची ‘काटेकोर’ अंमलबजावणी सुरू असतानाच वाकडेवाडी येथील एका सरकारी कार्यालयात दुपारच्या जेवणाचे पार्सल आले ते चक्क प्लॅस्टिकच्या पिशवीतून! त्यामुळे जेवणाच्या टेबलावर अधिकाऱ्यांमध्ये चविष्ट जेवणाऐवजी ‘प्लॅस्टिक बंदी’ हाच विषय रंगला. 

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या पुढाकाराने एप्रिलपासून प्लॅस्टिक बंदी करण्यात आली. कदम वेगवेगळ्या भागांत जाऊन प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीचा स्वतः आढावा घेत आहेत. प्रत्यक्षात मात्र सरकारी कार्यालयामध्ये प्लॅस्टिकमधून जेवणाचे पार्सल येत असल्याची माहिती पुढे आली.

राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) अधिकारी शहराच्या गल्ल्या-गल्ल्यांमध्ये फिरून प्लॅस्टिक विक्री करणाऱ्यांवर धडाधड कारवाई करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर या कार्यालयात सदाशिव पेठेतील प्रसिद्ध हॉटेलमधून दुपारचे जेवण मागविले होते. हे पार्सल बरोबर जेवायच्या वेळेत कार्यालयात आले. पण, ते आले नेमके प्लॅस्टिकच्या पिशवीतून! राज्यात प्लॅस्टिक बंदी सुरू असतानाच सरकारी कार्यालयामध्ये प्लॅस्टिकमधून आलेल्या पार्सलमुळे अधिकाऱ्यांची धांदल उडाली. पण एका चाणाक्ष अधिकाऱ्याने प्लॅस्टिकच्या पिशवीवर ‘एक्‍सटेंडेट प्रोड्युसर रिस्पॉसिबिलिटी’चा (ईपीआर) क्रमांक असल्याचे दाखविले. अर्थात हा क्रमांक असा छापला होता की तो कोणालाच वाचता आला नाही. पण ही पिशवी बंदीतील नाही, हे मात्र त्यातून उघड होत असतानाच दुसऱ्या अधिकाऱ्याने हा ‘ईपीआर’ गुजरातमधील भरूच येथील असल्याचा दावा केला. त्यामुळे पुण्यात गुजरात येथून ‘कायदेशीर’ मार्गाने प्लॅस्टिकच्या पिशव्या येत असल्याचा निष्कर्ष निघाला. तोपर्यंत या अधिकाऱ्यांचे जेवण झाले होते. शिपायाने या सगळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या गोळा केल्या आणि कचऱ्याच्या डब्यात टाकल्या. त्यानंतर अधिकारी आणि तो शिपाई आपापल्या कामात व्यस्त झाले. 

सरकारी कार्यालयात प्लॅस्टिकच्या पार्सलमधील झालेल्या जेवणावळीबद्दल ‘सकाळ’ला माहिती मिळताच संबंधित खाते व ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे (एमपीसीबी) सहसंचालक नंदकुमार गुरव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.

‘ईपीआर’ म्हणजे काय?
‘एक्‍सटेंडेट प्रोड्युसर रिस्पॉसिबिलिटी’ म्हणजे प्लॅस्टिकची पिशवी तयार करणाऱ्या उत्पादकाने त्याचा वापर झाल्यानंतर ती पुन्हा संकलित करण्याची व्यवस्था निर्माण करायची असते. उत्पादकाने स्वतः पुन्हा उत्पादनासाठी याचा वापर करणे आवश्‍यक असते, अशी माहिती मिळाली. त्यामुळे पुण्यातील हॉटेलमध्ये भरूच येथील पिशवी आली असल्याचा दावा करणाऱ्या त्या अधिकाऱ्यापुढे ही प्लॅस्टिकची पिशवी परत संकलित कशी करणार, असे मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com