ईडीकडूनही गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. "ईडी'ने मुंबई व जवळपासच्या परिसरातील सहा विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. याशिवाय पीएमसी बॅंकेचे निलंबित संचालक जॉय थॉमस यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज अटक केली. 

याप्रकरणी 44 संशयित खात्यांपैकी 10 खात्यांचा गैरव्यवहार उघड झाला असून, उर्वरित 34 खात्यांची माहिती उघड करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्याची 4355 कोटींच्या गैरव्यवहाराची रक्कम वाढण्याची शक्‍यता आहे. रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी बॅंकेचे निलंबित संचालक जॉय थॉमस, अध्यक्ष वरियर सिंग व इतर पदाधिकारी तसेच "एचडीआयएल'चे संचालक राकेश वाधवा, सारंग वाधवा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. "ईडी'नेही आता याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणात झालेल्या कथित मनी लॉंडरिंगचा तपास करणार आहे. 

पीएमसी बॅंक गैरव्यवहार प्रकरणात जॉय थॉमस हे प्रमुख संशयित आहेत. त्यांच्या चौकशीतून या प्रकरणातील महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्‍यता असल्यामुळे त्यांचा ताबा घेऊन चौकशी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस त्यांच्याबाबत माहिती घेत होते. अखेर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सहपोलिस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) राजवर्धन सिन्हा यांनी दिली. या प्रकरणातील ही तिसरी अटक असून यापूर्वी एचडीआयएलचे राकेश व सारंग वाधवा यांना अटक करण्यात आली होती. त्या दोघांनाही 9 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

विशेष पथके तयार  
रिझर्व्ह बॅंकेने नियुक्त केलेल्या प्रशासकाच्या जसबीरसिंग मठ्ठा यांनी सोमवारी आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दिली. त्याआधारे कट रचून खोटी कागदपत्रे तयार करणे आणि त्यांचा फसवणुकीसाठी वापर करणे या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने विशेष तपास पथक तयार केली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC Bank fraud case ED filed a crime