'लाठीमार करणाऱ्या  पोलिसांवर कारवाई करा'

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

मुंबई - नोटाबंदी विरोधात नागपूर येथे कॉंग्रेसच्या वतीने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियासमोर झालेल्या आंदोलनात लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी केली. 

मुंबई - नोटाबंदी विरोधात नागपूर येथे कॉंग्रेसच्या वतीने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियासमोर झालेल्या आंदोलनात लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विरोधी पक्षनेत्यांनी ही मागणी केली. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, हे आंदोलन अतिशय शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ बॅंकेत गेले असताना बाहेर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर प्रचंड लाठीमार केला. त्यामध्ये अनेकांना दुखापती झाल्या. दडपशाही पद्धतीने आंदोलन पांगविण्याचा प्रयत्न केल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारणा केली असता त्यांनाही मारहाण करून ताब्यात घेण्यात आले. पोलिस प्रशासनाच्या या दडपशाहीच्या निषेधार्थ कॉंग्रेसला त्याच ठिकाणी पुन्हा ठिय्या आंदोलन करावे लागले. 

पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर नाहक लाठीमार करून परिस्थिती गंभीर करण्याच्या या प्रकाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Web Title: The police action on the baton