
Sanjay Raut News : CM शिंदेंवरील टीका भोवणार? राऊतांविरोधात नाशिकपाठोपाठ ठाण्यातही गुन्हा दाखल
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान आता उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना केलेल्या बदनामीकारक वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात नाशिक आणि ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चाटूगिरी असा बदनामीकारक शब्द वापरल्याने संजय राऊत यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात कलम ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांत हा अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
राऊत काय म्हणाले होते?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी पुणे दौऱ्यावर होते, यावेळी शहांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले. पण निवडणूक आयोगाने दूध का दूध. पानी का पानी केले, असं विधान त्यांनी केलं . शाह यांचं हे विधान ठाकरे गटाच्या जिव्हारी लागलं आणि वाद सुरू झाला होता.
दरम्यान, शहा यांच्या विधानानंतर पलटवार करताना राऊत यांची जीभ घसरली. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केलं. हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचं ढोंग आहे. टोकाची चाटूगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला न्याय देत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली होती.