
Crime News : यवतमाळ मध्ये मुंबई पोलीस झाले वऱ्हाडी, वेशांतर करून गुन्हेगाराची काढली वरात!
मुंबई : मुंबईतील वरळी येथील एका घरातून ५० लाख रूपयांची रोकड चोरून गेल्या १५ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी लग्नातील पाहुणेमंडळींचा वेष परिधान करत आरोपीला पकडले आहे. दादर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील दुर्गम असलेल्या सायखेडा या गावात जात ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकर याने १७ मार्च २०२२ रोजी वरळी येथील वीर नरिमन रोडवरील संदीप जगन्नाथ देसाई (४२) यांच्या घरी ते पनवेल येथे त्यांच्या फार्म हाऊसवर पुजेसाठी गेले असता चोरी केली होती. या चोरीमध्ये त्याने तब्बल ५० लाख रूपयांची रोकड लंपास केली होती. त्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला परंतु आरोपीने खोटी चावी वापरून घरात प्रवेश केल्याने पोलिसांना संशय आला.
देसाई यांच्याकडे प्रदीप कानडे हा व्यक्ती ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने देवकर याला खोटी चावी दिल्याचं सांगितलं असं दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश मुगुटराव यांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे देवकर याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचा शोध लागू शकला नाही. पोलिसांनी त्याचे नातेवाईक राहुल कुराडकर, मनीष परब, भूषण पवार आणि मंगला कुराडकर यांना अटक केली. देवकर याने राजस्थानमध्ये कार शोरूम सुरू केले होते पण तिथेही त्याने लोकांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, खार येथील देवकर यांच्या नातेवाईकांवर पोलिसांचे लक्ष होते. त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला असता आणि फोन ट्रॅक केले असता ते यवतमाळ तालुक्यातील दारवा येथील सायखेडा येथे कुणाच्यातरी लग्नाला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.
प्रवासात असताना देवकर याच्या भाचीचे लग्न असल्याचं पोलिसांना समजलं. तो या लग्नाला येणार असल्याच्या अपेक्षेने पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. ओळखू येऊ नये म्हणून पोलिसांनी बारातीचा (पाहुणे मंडळींचा) पोषाख परिधान केला होता. गर्दीत देवकरची ओळख पटल्यावर आम्ही त्याला दूर नेत अटक केली असं दादर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण सागडे यांनी सांगितले.
देवकर याला महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असून त्याला २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.