अजित पवारांच्या बारामतीतील घरासमोरील पोलिस बंदोबस्त वाढविला 

मिलिंद संगई
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानासमोर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. 

बारामती शहर : हे काय झालंय...काय नेमक चाललंय...पुढे काय होणार...साहेबांची काय भूमिका आहे....असे अनेक प्रश्न आज बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपुढे होते...अजित पवार यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ भाजपच्या सरकारला पाठिंबा देत घेतल्यानंतर बारामतीत प्रचंड खळबळ माजली. 

दोन परस्परविरोधी विचारधारा असलेले पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील आणि अजित पवार हे भाजपसोबत जातील, यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. या परिस्थितीत नेमकी काय भूमिका घ्यायची हेच कार्यकर्त्यांना समजत नव्हते. 
राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ पदाधिका-यांशी संपर्क साधल्यानंतर सर्वांनीच वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली दिसली.

दरम्यान, सध्या घडत  असलेले नाट्य नेमके काय आहे हेच भल्या भल्यांना समजत नाही. प्रत्येकजण आपापल्या परिने अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत होते. आज सकाळपासून बारामतीत केवळ या एकाच विषयाची सगळीकडे चर्चा होती. लोकांचे दैनंदिन कामकाज सुरु झालेले असले तरी सगळेच टीव्हीसमोर बसून क्षणाक्षणाला बदलणा-या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून होते.

अनेकांनी स्वताःची वैयक्तिक मते सांगितली मात्र प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया देण्यास कोणाचीच तयारी नव्हती. 
काही कार्यकर्त्यांनी मात्र थोड थांबा यात नेमक काय आहे ते समोर येईल असे सांगितले, मात्र तरिही अजित पवार यांनी बंड केलंय, राष्ट्रवादीतून बाहेर पडून त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे का, शरद पवार सुप्रिया सुळे यांना या बाबतची माहिती होती की नव्हती, जर अजित पवार यांनी बंडाची भूमिका घेतली असेल तर कार्यकर्त्यांनी नेमक काय करायच, अशा अनेक प्रश्नांवर आपापसात चर्चा सुरु होत्या. 

तासातासाला मुंबईत नाट्यमय घडामोडी होत असताना दुसरीकडे बारामतीतही कमालीची अस्वस्थता आहे. हे नाट्य नेमके कोणत्या दिशेने चाललंय आणि पुढे काय होणार याचीच उत्सुकता लोकांना आहे. युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण या एकाच विषयावर चर्चा करत होते. 

सहयोग निवासस्थानासमोरील पोलिस बंदोबस्त वाढविला-राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानासमोर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.  अजित पवार यांनी भाजपसोबत जात आज सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. त्या नंतर वेगाने घडामोडी सुरु असून, या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग निवासस्थानासमोर पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. कोणताही अनुचित घटना घडू नये या उद्देशाने हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police in front of Ajit Pawar's Baramati's house