राज्यातील पोलिस पाटील सहा महिन्यांपासून मानधनापासून वंचित

मिलिंद संगई
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

राज्यातील तीस हजारांहून अधिक पोलिस पाटलांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे.

बारामती शहर : राज्यातील तीस हजारांहून अधिक पोलिस पाटलांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. दिवाळीतही पोलिस पाटलांना काहीही मानधन न मिळाल्याने त्यांची दिवाळी अंधारातच गेली आहे. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करुनही मानधनाबाबत काहीही हालचाल होत नसल्याने पोलिस पाटलांमध्ये नाराजीची भावना आहे. या संघटनांकडून आंदाेलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्यापासून राज्य शासनाने पोलिस पाटलांचे मानधन वाढवून ते 6500 रुपयांवर नेले. मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्यापासून पोलिस पाटलांना मानधनच दिलेले नाही. गृह विभागाकडून सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांद्वारे हे मानधन पोलिस पाटलांच्या खात्यावर जमा केले जाते.

दिवाळीत तरी मानधन जमा होईल अशी अपेक्षा पाेलिस पाटलांना होती, मात्र निवडणूकांच्या धामधूमीसह आचारसंहितेमुळे ते जमा झालेले नसावे, असे काही पोलिस पाटलांनी सांगितले. ग्रामस्तरावर इतर पदांइतकेच पोलिस पाटील या पदालाही महत्व असते. अनेक महत्वाच्या प्रसंगात पोलिस पाटलांची पोलिस विभागासह महसूल व इतर विभागही मदत घेत असतात. पोलिसांप्रमाणेच सतत कर्तव्यावर तत्पर असलेल्या पोलिस पाटलांच्या मानधनाबाबत राज्य सरकार इतके उदासिन कसे असा सवाल आता उपस्थित होत आहे.

पोलिस पाटील संघटनेकडून पाठपुरावा करुनही मानधन जमा होत नसल्याने पोलिस पाटील हवालदिल झाले आहेत. ग्रामीण भागात अनेक पोलिस पाटलांच्या प्रपंचासाठी हे मानधन महत्वाचा घटक असते, मात्र शासनाची उदासिनता पोलिस पाटलांच्या दृष्टीने क्लेषदायक ठरु लागली आहे. 
मानधन वेळेत जमा होत नाही याची पोलिस पाटलांना सवय असली तरी किमान दिवाळीत तरी सर्व मानधन सरकारने देऊन पोलिस पाटलांना दिवाळीची भेट द्यायला हवी होती, अशी अपेक्षा फोलच ठरली.

पोलिस पाटलांचे मानधन वेळेत जमा व्हावे इतकीच आमची अपेक्षा आहे. दिवाळीत शिल्लक मानधन मिळाले असते तर पोलिस पाटील कुटुंबाची दिवाळी अधिक गोड झाली असती, मात्र मानधन अजूनही मिळालेले नाही. सहा महिन्यांचे मानधन अजूनही मिळालेले नाही, या मानधनाची आम्हाला प्रतिक्षा आहे - शरद खोमणे, अध्यक्ष, बारामती पोलिस पाटील संघटना. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Patil in the state deprived of payment for six months