
Police Recruitment : पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत गैरप्रकार; 5 परीक्षार्थी अटकेत
मुंबई : मुंबई पोलीस दलात भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या 5 उमेदवाराना गुरूवारी अटक करण्यात आली आहे. 7 मे रोजी मुंबई पोलीस दलाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा मुंबईत पार पडली. रवींद्र काळे, नितेश आरेकर, अशोक ढोले, युवराज जारवाल, बबलुसिंग मेढरवाल अशी आरोपी परीक्षार्थीची नावे आहेत.
परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे, गोरेगाव पोलिस ठाणे, मेघवाडी पोलिस ठाणे आणि भांडुप पोलिस ठाण्यात 4 स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. यावेळेस उमेदवारांनी कॉपी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पोलिसाना निदर्शनास आले आहे.
मुन्नाभाई स्टाईलने कॉपी
मुन्नाभाई चित्रपटात अभिनेता संजय दत्त ज्याप्रकारे वैद्यकीय परीक्षा पास होतात. तशीच काहीशी पद्धत पोलीस भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यानी अवलंबली होती कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे हद्दीतील जे बी खोत हायस्कूल केंद्रावर रविंद्र काळे नावाचा उमेदवार कानात ब्ल्यू टूथचा वापर करून पेपर सोडवत होता.
इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर
भांडुप परीक्षा केंद्रावर बबलूसिंग मेंढरवाल हा परीक्षार्थी इलेक्ट्रीक इअरबर्डद्वारे अज्ञात व्यक्तीच्या संपर्कात राहून पेपर सोडवत होता.विशेष म्हणजे त्याने उजव्या हातामध्ये मनगटापासून कोपर्यापर्यंत सनग्लोव्ज घातले होतें.त्यामध्ये सिमकार्ड ,चार्जिंग सोकेट ,मायक्रो माइक असलेले आयताकृती इलेक्ट्रनिक डिव्हाईस असे साहित्य लपवले होते. भांडुप व मेघवाडी पोलिस ठाणे परिसरातील केंद्रावरही अशाच प्रकारे काॅपी करण्याचा प्रयत्न केला गेला.

पोलीस बंदोबस्त
पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या भरतीच्या अनुषंगाने लेखी परीक्षेचे आयोजन केले होते.लेखी परीक्षा 7 मे रोजी एकाचवेळी मुंबईतील एकुण 213 केंद्रांवर आयोजित करण्यात आली. परीक्षेस 83748 परीक्षार्थीपैकी एकुण 78522 परीक्षार्थी उपस्थित होते. सदर परीक्षेकरीता एकुण 1246 पोलीस अधिकारी आणि 5975 पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त नेमण्यात आला होता.