एप्रिलमध्ये पोलिस भरतीची ‘लेखी’? तृतीयपंथीच्या ’मैदानी’चे २८ फेब्रुवारीपर्यंत ठरणार निकष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस
एप्रिलमध्ये पोलिस भरतीची ‘लेखी’? तृतीयपंथीच्या ’मैदानी’चे २८ फेब्रुवारीपर्यंत ठरणार निकष

एप्रिलमध्ये पोलिस भरतीची ‘लेखी’? तृतीयपंथीच्या ’मैदानी’चे २८ फेब्रुवारीपर्यंत ठरणार निकष

सोलापूर : ‘मैदानी’त उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका पदासाठी दहा उमेदवारांची मेरिटनुसार ‘लेखी’साठी निवड होणार आहे. त्यानुसार एक लाख ८३ हजार ३१० उमेदवार लेखीसाठी पात्र ठरतील. पण, तृतीयपंथींची ‘मैदानी’ झाल्याशिवाय पोलिस भरतीच्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेताच येणार नाही. निकष ठरल्यानंतर मार्चमध्ये त्यांची मैदानी चाचणी पार पडेल. दुसरीकडे दहावी-बारावीसह बहुतेक विद्यापीठांच्या परीक्षांमुळे केंद्रे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे पोलिस भरतीची लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यात १८ हजार ३३१ पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील ‘मैदानी’चा पहिला टप्पा संपला आहे. परंतु, तृतीपंथींच्या मैदानी चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. ७२ तृतीयपंथींची मैदानी चाचणी रखडल्याने एक लाख ८४ हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे. राज्याच्या गृह विभागाला पुरेसे मनुष्यबळ मिळावे, या हेतूने दोन वर्षांपासून नियोजित असलेली पोलिस भरती आता सुरु आहे. पोलिस शिपाई, चालक अशी एकूण १८ हजारांहून अधिक पदे भरली जात आहेत. त्यासाठी तब्बल १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

दरम्यान, पोलिस भरतीसाठी तृतीयपंथी देखील अर्ज करू शकतात, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आणि त्या काळात राज्यभरातून ७२ तृतीयपंथींनी पोलिस भरतीसाठी अर्ज केले. तरीपण सर्व जिल्ह्यातील पोलिस प्रमुखांनी पहिल्यांदा तृतीयपंथी वगळून सर्वच उमेदवारांची मैदानी चाचणी सुरु केली.

सोलापूरसह बहुतेक जिल्ह्यांमधील उमेदवारांची मैदानी चाचणी आठवड्यापूर्वीच संपली आहे. ‘तृतीयपंथी’च्या मैदानी चाचणीचे निकष निश्चित करून २८ फेब्रुवारीपूर्वी सुद्धा न्यायालयात तो अहवाल सादर करता येऊ शकतो. पण, अजून निकष न ठरल्याने त्या उमेदवारांची मैदानी मार्चमध्ये होईल. त्यानंतर सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समितीचा अहवाल अजूनही तयार नाही

तृतीयपंथींच्या मैदानीचे निकष ठरविण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र समिती नेमली आहे. या समितीने ३१ जानेवारीपर्यंत निकष ठरवून गृह विभागाला देणे अपेक्षित होते. त्यानंतर २८ फेब्रुवारीपर्यंत त्यासंबंधीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाणार होता. पण, अजूनही तृतीयपंथींना मैदानी चाचणीसाठी किती मीटर धावावे लागेल, गोळाफेक किती मीटर जायला हवा, चालक पदासाठी कोणते निकष, असतील हे निश्चित झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी एक महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.