राज्यात ‘गाव तेथे पोलिस’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मुंबई -  राज्यातील ग्रामीण भागातील महिला, मुली यांच्याबाबतच्या गुन्ह्यात वाढ होऊ नये, यासाठी ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्या सुरक्षिततेसाठी ‘गाव तेथे पोलिस’ हा उपक्रम राज्य सरकारच्या गृहविभागाकडून राबविला जाणार आहे.

मुंबई -  राज्यातील ग्रामीण भागातील महिला, मुली यांच्याबाबतच्या गुन्ह्यात वाढ होऊ नये, यासाठी ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्या सुरक्षिततेसाठी ‘गाव तेथे पोलिस’ हा उपक्रम राज्य सरकारच्या गृहविभागाकडून राबविला जाणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा प्रसार यामुळे महिला, मुली यांच्यावरील गुन्ह्यांच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे छेडछाड, विनयभंग यांसह इतर गुन्ह्यांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. हे रोखण्यासाठी ग्रामीण भागात गावपातळीवर ‘गाव तिथे पोलिस’ ही संकल्पना राबविणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदा प्रायोगिक पातळीवर ‘गाव तिथे पोलिस’ हा प्रयोग राबविण्यात आला. यामुळे गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था, तसेच गावामध्ये होणारे छोटे-छोटे तंटे, इतर घटनांची माहिती पोलिसांना मिळत गेली. त्याचा चांगला फायदा झाल्यामुळे हा प्रयोग राज्यभर करण्याचा मानस गृहविभागाने केला आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये आयपीएस दर्जाचे अधिकारी, तसेच महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. ही समिती अधिकचा अभ्यास करून ही संकल्पना अधिक व्यापक करणार आहे.

पोलिस पाटलांचे अधिकार वाढवणार
गावपातळीवर पोलिस पाटील महत्त्वाची जबाबदारी निभावत असतात. मात्र, त्यांचे अधिकार कमी आहेत. ते वाढविण्याचा प्रयत्न करणार असून, गृह विभागाच्या अखत्यारीत पोलिस पाटलांना आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Police in rural areas of the state