
Amruta Fadnavis Blackmail Case : जयसिंघानी ७२ तास देत होता गुंगारा; पोलिसांनी सांगितला अटकेमागचा घटनाक्रम
अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. हा जयसिंघानीच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते. यादरम्यान जयसिंघानी हा तब्बल ७२ तास पोलिसांना गुंगारा देत होता. नेमकं या ७२ तासांत काय घडलं याबद्दल पोलिसांनीच पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
बुकी जयसिंघानीच्या अटकेनंतर डीसीपी बालसिंग राजपूत यांनी माहिती दिली की, या आरोपीविरोधात २० फेब्रुवारी रोजी मलबार पोलिस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा दाखल झाला. हा आरोपी तांत्रिक बाबींची मदत घेऊन स्वतःची ओळख लपवत होता असे पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, यासंदर्भात गुन्हे शाखेने पाच पथके निर्माण केली होती. यामध्ये सायबर गुन्हे शाखेची तिन पथके तर सीआयओचे एक आणि गुन्हे शाखा युनिटचे एक पथक जयसिंघानीच्या अटकेसाठी वेगवेगळ्या राज्यात मोहिम राबवत होते.
पोलिसांनी सांगितले की, तांत्रिक विश्लेषनात सदर आरोपी हा महाराष्ट्रातील शिर्डीतून गुजरात मधील बार्डोली येथे गेल्याचे आढळून आले. यानंतर गुजरातेत गुन्हे शाखेचे तीन पथके पाठवण्यात आले होते. या पथकांनी गुजरात मधील सुरत पोलिस तसेच बडोदरा येथील पोलिसांशी समन्वय करत गुजरातमध्ये मोहिम राबवली.
अनिल जयसिंघानीला कसं पकडलं?
सदरचा आरोपी ७२ तास पोलिसांना चकवा देत होता. बारदोली येथे पोलिसांनी सापळा रचला पण तेथून तो निसटला. नंतर पोलिसांनी सुरतमध्ये देखील पोलसांनी सापळा रचला पण तेथेही तो सापडला नाही. बोर्डोलीहून सुरत, बडोदा मार्गे गोधरा येथे पळून जात असताना ७२ तासांच्या पाठलागानंतर त्याला नाकाबंदी करून रात्री पावणेबाराच्या सुमारास कलोल या गोधराजवळच्या ठिकाणी पकडण्यात आलं.
आरोपीकडून मोबाईल, इंटरनेटचे डिव्हाईस कार देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी आरोपी अनिल जयसिघांनी याला मदत करणाऱ्या लोकांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अनिल जयसंघानी हा लोकेशन लपवणे आणि पोलिसांना गुंगारा देण्यात तरबेज असल्याचे देखील पोलिसांनी स्पष्ट केले. जयसिंघानी याला तसेच त्याला मदत करणाऱ्यांना आज (दि. २०) मलबार पोलिस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या सात वर्षापासून जयसिंघानी फरार होते. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. अमृता फडणवीस यांच्या प्रकरणानंतर त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिस शोध घेत होते. अखेल गुजरातमधून त्यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती.