भाजप सरकारच्या काळात राजकिय आंदोलनं बेदखलचं...! 

BJP
BJP

मुंबई : जनसामन्यांची उत्स्फुर्त आंदोलनं होत असतील तर एकवेळ चर्चा होईल. पण कोणत्याही राजकिय पक्षाच्या आंदोलनाची सहजासहजी दखल घ्यायचीच नाही. राजकिय पक्षाची आंदोलनं बेदखल होतील यासाठीच कटाक्षाने हाताळणी करायची. असा अलिखित नियमच भाजप सरकारच्या काळात सुरू असल्याचे चित्र आहे. 

सध्या स्वाभिमानी शेतकरी संघठनेचं दुध दरवाढीचं आंदोलन सुरू आहे. खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या या आंदोलनाती तीव्रता वाढत असताना अजूनही सरकारने याची गांभीर्यानं दखल घेतलेली दिसत नाही. उलटपक्षी भाजपचे शेतकरी नेते पाशा पटेल यांना दिल्लीत बोलावून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रेल्वेमंत्री पियुष गोयल याच्यासोबत बैठक करून भाजपने राजू शेट्टीच्या आंदोलनाला पुर्णत: बेदखल केल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहे. 

या अगोदर राज्यात कोणत्याही राजकिय पक्षाच्या घोषणेशिवाय शेतकरी संप पुकारण्यात आला होता. त्यावेळीही या संपाकडे सरकारने सुरूवातीला कानडोळा केला होता. मात्र शेतकरी संघठना व शेतकरी यांच्या उत्स्फुर्त पाठिंब्याने संपाला हिंसक वळण लागले. नंतर सरकारने रातोरात धावपळ करून शेतकरी समन्वय समिती सोबत मध्यरात्री बैठक घेतली. यामधेही प्रस्थापित शेतकरी नेत्यांना सरकारने बेदखल केले होते. त्यानंतर डाव्या पक्षानी आदिवासी शेतकरी बांधवाची नाशिक ते मुंबई अशी पायी दिंडी काढली. सरकारने हे राजकिय आंदोलन असल्याने त्याकडे पुर्णत: दुर्लक्ष केले. पण जेंव्हा लाखो आदिवासी मुंबईत पोहचले अन त्यांच्या व्यथांनी देशभरात आवाज केला. तेव्हा सरकार जागे झाले व बैठक झाली. 

मराठा क्रांती मोर्चातही सरकार सुरूवातीला काहीच गंभीर नसल्याचे चित्र होते. पण एकामागोमाग एक असे ऐतिहासिक मोर्चे निघत असल्याने सरकार जागे झाले व त्यांनी प्रस्थापित मराठा नेत्यांना बाजूला सारत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयाकांसोबत चर्चा केली. 

कोणत्याही राजकिय पक्षाला श्रेय घेण्याची संधी मिळणार नाही यासाठीच सरकारची आंदोलनाबाबत ही भूमिका असल्याचा सुर विरोधी पक्षासह संघठनांमधे आहे. 
सध्या दुधदराचे आंदोलनही याच टप्प्यावर पोहचले आहे. राजू शेट्टी यांचे तीस वर्षाचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी भाजपची कास धरली असून खोत यांना पुढे करून आंदोलनाला बेदखल करत असल्याचे संकेत सरकारने सुरूवातीला दिले. 

आता तर आंदोलकांशी चर्चा करण्याऐवजी राज्यभरात कडक पोलिस बंदोबस्त लावून आंदोलकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याचा संताप व्यक्त होत आहे. राजू शेट्टी यांना सहजासहजी श्रेय मिळणार नाही यासाठीची ही रणनिती असल्याचे मानले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com