मुख्यमंत्र्यांचा पंकजा मुंडेंना चेकमेट?

4pankaja1_0.jpg
4pankaja1_0.jpg

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’च्या कक्षेत आणण्याबाबत राज्य सरकारच्या वतीने आधी ठाम भूमिका मांडल्यानंतर सभागृह सुरू राहावे याकारणासाठी त्या भूमिकेला स्थगिती देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावरून राज्य सरकारमध्ये दरी पडली असून महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर नाराज झाल्या आहेत अशी चर्चा आहे. फेसबुकवर ‘बाबा तुमची आठवण येते’ अशा आशयाची पोस्ट टाकून पंकजा मुंडे गुरुवारी दिवसभर विधिमंडळात गैरहजर राहिल्या. गेल्या अनेक दिवसापासून महिला बालकल्याण विभागाच्या वरिष्ठ महिला अधिकारी आणि अंगणवाडी सेविका यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. या प्रकरणात हे शीतयुद्ध शिगेला पोहचलं. अंगणवाडी सेविकांना सहा सहा महिने वेतन न देण्याचे प्रकार वाढले. या महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधातही अंगणवाडी सेविकांनी रणशिंग फुकले होते. २६ दिवस राज्यातील अंगणवाड्या ठप्प होत्या.

महिला बालकल्याण विभागात लहान बचतगटांची मक्तेदारी मोडून काढण्यात आली. ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी थेट उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधारही घेण्यात आला. ही या मेस्मा कायदा लागू करण्याची एक बाजू आहे. उच्च न्यायालयाने मेस्मा लावा अस कुठेही म्हटलेलं नव्हतं. येत्या काळात महिला बालकल्याण विभागात दोन टेंडर येऊ घातले आहेत त्यात ठेकेदार आणि अंगणवाडी सेविकांमध्ये संघर्ष नक्की ठरला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेस्मा लावण्यात अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये मिलिभगत आहे का असाही प्रश्न विचारला जातोय. अंगणवाडी बालकांना दिला जाणार आहार बालकांना मिळतो की नाही याची माहिती मोबाईल अँप ने शासनाला आता पुरवायची आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल पुरवण्यात येणार होते. यासाठी २४ कोटींचा निधी वितरितही झाला पण याची वर्क ऑर्डर अजूनही निघालेली नाही. तर पुढील महिन्यात ताजा पोषण आहार जाऊन त्या जागी मोठ्या संस्थांना रेडी टू कुक चे कंत्राट देण्यात आले. याला अंगणवाडी सेविकेचा विरोध आहे. हा विरोध ठेकेदारांना मोडून काढायचा आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मेस्माच्या अखत्यारित आणल्यावरून शिवसेनेने व राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुधवारी सभागृह बंद पाडले. मेस्माचा निर्णय रद्द केल्याशिवाय सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही, असा पवित्रा सरकारमध्ये भागीदार असलेल्या शिवसेनेने घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्माच्या निर्णयाला स्थगिती देत त्यावर तोडगा काढण्याचे ठरवले. त्याबाबतची घोषणा गुरुवारी सकाळीच सभागृहात करण्याचे ठरवले. मात्र पंकजा यांना मुख्यमंत्र्यांचा निर्णय पसंत पडला नाही. बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची लँडलाईन वरून चर्चा झाली. मेस्मा कायदा लागू करण्यास स्थगिती देण्याविषयी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. जर स्थगिती द्यायची होती तर आधी हा निर्णय का घेऊ दिला? असा प्रश्न पंकजा मुंडेनी उपस्थित केला. यावर दोघांमध्ये गरमा गरम चर्चाही झाल्याची बातमी आल्यानं सगळच काही आलबेल नाही हे स्पष्ट झालं. दोन दिवसांनी विरोधक अचानक आक्रमक का झाले?  या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांची अंगणवाडी सेविका मध्ये प्रतिमा दूषित झाली का?  या नंतर मेस्मा ला स्थगिती देऊन मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांची सहानुभूती मिळवली का? यामागे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये राजकीय चेकमेंट झालंय हे स्पष्ट होतं.

गेले दोन दिवस मेस्मावरून पंकजा मुंडे सभागृहात ठाम भूमिका घेत होत्या. उच्च न्यायालयातील याचिकेवरूनच विधि व न्याय विभागाच्या अभिप्रायानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मेस्माच्या अखत्यारित आणण्याचा निर्णय झाल्याचे त्या सांगत होत्या. मात्र आता अचानक घूमजाव का करायचे असा त्यांचा प्रश्न होता. त्याचबरोबर आपल्याला तोंडघशी पाडण्यात येत असल्याचीही त्यांची भावना झाली. त्यामुळे पंकजा यांनी सरकारच्या या माघारीशी आपण सहमत नाही हे दाखवून देण्यासाठी गुरुवारी विधान भवनात न येणे पसंत केले. फेसबुकवर  वडील गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र टाकून, ‘बाबा..’ अशी पोस्ट टाकली. त्याचबरोबर ‘तुमच्या नसण्याची मला कायम जाणीव होते’ अशा आशयाचा संदेश असलेले चित्रही त्याबरोबर टाकले.  पंकजा मुंडे यांच्या खात्याच्या अंगणवाडी पोषण आहारासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याबाबत आणि महिला उद्योजक धोरणाबाबत अशा दोन बैठका विधान भवनात होत्या. तरीही त्या विधान भवनाकडे फिरकल्या नाहीत.

यावर स्पष्टीकरण देताना पंकजा मुंडे म्हणाल्या कि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबद्दल मी अजिबात नाराज नाही. माझ्याशी चर्चा करूनच त्यांनी निर्णय घेतला. यावरून आमच्यात कटुता आलेली नाही. माझ्या बाबांबाबत भावनिक फेसबुक पोस्ट ही मी काल रात्री टाकलेली होती. आजच्या निर्णयाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. एका मासिकाने माझ्यावर विशेषांक काढला. रात्री तो वाचताना मी भावनिक झाले व ती पोस्ट टाकली. त्यामुळे आजच्या निर्णयाचा त्याच्याशी संबंध नाही. विविध बैठकांमुळे आज उपस्थित राहू शकलो नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com