गटातटाचे राजकारण नष्ट करणार..! - बाळासाहेब थोरात

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 जुलै 2019

‘ईव्हीएम हटाओ’ची घोषणाबाजी..
या कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा अनपेक्षित पराभव झाल्याचे स्पष्ट केले. जनमानसात भाजपच्या सत्तेविरोधात तीव्र नाराजी असतानाही मते कशी मिळाली याची शंका येते असे सांगताच, कार्यकर्त्यांमधून ‘ईव्हीएम हटाओ’ची घोषणाबाजी झाली. यावर येत्या ९ ऑगस्टला ईव्हीएमविरोधात देशव्यापी बिगरराजकीय आंदोलन उभे राहणार असून, काँग्रेस कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.

मुंबई - काँग्रेससमोर कठीण काळ आहे. मात्र १९७८ ते १९८०ला देखील कठीण काळ असताना प्रदेशाध्यक्ष रामराव आदिक यांनी काँग्रेसला सत्ता मिळवून दिली. ते नगरचे होते, मीपण नगरचा असून कठीण काळात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे पक्षातले गटातटाचे राजकारण संपवून नव्या युवा चेहऱ्यासोबत काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी सज्ज व्हा, असा निर्धार काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज पदग्रहण समारंभात केला. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित या सोहळ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करत सर्व काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. सामान्य माणसांच्या मनात काँग्रेस आहे. पराभवाने खचून न जाता आपण आता घरातले पंजाचे बिल्ले बाहेर काढा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. 

मी पक्षात कधीही गटतट हा विषय मानत नाही, मी सर्वांना समान ठेवणार आहे; पण तुमच्या मानातले गटतट दूर करा, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत युवकांना व नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले. यावेळी उपस्थित असलेले माजी प्रदेशाध्य अशोक चव्हाण यांनी, मला कोणी राजीनामा द्यायला सांगितले नाही, ज्यांना कुणाला माझा निरोप समारंभ करायचा आहे, तो मी होऊ देणार नाही. काँग्रेस माझ्या रक्तात आहे, अशा भावना व्यक्त केल्या. 

या वेळी राजीव सातव, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विजय वडेट्टीवार, नसीम खान, रजनी सातव, मल्लीकार्जुन खर्गे यांचीही भाषणे झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics Congress Balasaheb Thorat Politics