शहरांत फुलण्याचा कमळाला विश्‍वास

- मृणालिनी नानिवडेकर
मंगळवार, 17 जानेवारी 2017

पण गावांत हवी; बाणाची साथ

पण गावांत हवी; बाणाची साथ
मुंबई - परंपरागत नागपूरसह मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड या नव्या महानगरांमध्ये भाजप उत्तम कामगिरी नोंदवेल याबद्दल नेत्यांना विश्‍वास असला, तरी जिल्हा परिषदांत सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेची साथ आवश्‍यक वाटते आहे. नगरपालिका निवडणुकांत नगराध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष मतदान घेतल्याने भाजपला लक्षणीय यश मिळाले असले, तरी निवडून आलेल्या वॉर्ड पदाधिकाऱ्यांची कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकत्रित संख्या मोठी आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रावर मोहोर उठवायची असेल तर सध्या तरी शिवसेनेशिवाय तरणोपाय नसल्याचे भाजपच्या बड्या मंत्र्यांचे मत आहे.

कॉंग्रेसच्या आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठवलेला एकत्र लढण्याचा प्रस्ताव स्वीकारला गेल्याने आता शिवसेनेची साथ भाजपला मोलाची वाटते आहे. शिवसेनेने केवळ मुंबई- ठाण्यापुरती चर्चा मर्यादित ठेवू नये असे भाजपने कळवले असल्याचे समजते.

रात्री उशिरापर्यंत चाललेल्या भाजप- शिवसेनेच्या संयुक्‍त बैठकीपूर्वीच जिल्हा परिषदेत युतीची चर्चा व्हायला हवी, असे भाजप नेत्यांचे ठाम मत आहे. नोटाबंदीच्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी न झाल्याने ग्रामीण भागातले वातावरण भाजपला प्रतिकूल असल्याचे मानले जाते. ग्रामीण भागात भाजपचे फार मोठे संघटन नसल्याने दूध संघ, साखर कारखाने या माध्यमातून गावपातळीवर पसरलेल्या जाळ्याचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला लाभ होईल अशी धास्ती आहे.

जिल्हा परिषदांत वातावरण चांगले असल्याचे अहवाल असले तरी प्रत्यक्षात भाजपची परिस्थिती चांगली आहे, एवढेच नमूद करण्यात आले आहे. नगरपालिकांत पहिल्या क्रमांकावर पोचलेल्या भाजपने जिंकलेल्या जागांची संख्या 1090 आहे. कॉंग्रेसने दुसरा क्रमांक पटकावत 894 जागा जिंकल्या आहेत, त्यात राष्ट्रवादीने जिंकलेल्या 786 जागा मिळवल्यास ही संख्या 1680 होते. पहिल्या क्रमांकाच्या भाजपला या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने जिंकलेल्या 598 जागांची जोड दिल्यास सामना बरोबरीत सुटतो, या दोन्ही पक्षांची एकत्रित बेरीज 1688 वर जाते. ही आकडेवारी प्रातिनिधिक मानून भाजपने गावपातळीवर शिवसेनेची मदत आवश्‍यक धरली आहे. अर्थात, गावोगावचे कार्यकर्ते आणि दिल्लीकर श्रेष्ठींना युतीऐवजी स्वबळाचे प्रयोग आवडणार असले तरी अजेंडा म्हणून भाजप जिल्हा परिषदेतही आघाडी करा अशी अट घालणार, असे दिसते आहे.

Web Title: politics in municipal election