जलदिंडीतून कोल्हापुरकरांना प्रदूषणमुक्तीची हाक

‘पुन्हा साथ देवूया, चला, पंचगंगा वाचवूया’ मोहिमेला प्रारंभ; पंचगंगा घाटावर आज मुख्य कार्यक्रम
Pollution free call to Kolhapur residents from Jaldindi Panchganga river
Pollution free call to Kolhapur residents from Jaldindi Panchganga riversakal

कोल्हापूर : तमाम कोल्हापूरकर आणि ‘सकाळ’च्या पुढाकाराने राबवल्या जाणाऱ्या ‘पुन्हा साथ देवूया, चला, पंचगंगा वाचवूया’ या मोहिमेअंतर्गत आजपासून राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीला उत्साहात प्रारंभ झाला. पिरळ (ता. राधानगरी) येथील उगमापासून सुरू झालेली जलदिंडी सायंकाळी शिंगणापूर (ता. करवीर) येथील घाटावर पोचली. उद्या (शुक्रवारी) सकाळी शहरातील पंचगंगा घाटावर जलदिंडीचे स्वागत होईल. यानिमित्ताने घाटाची स्वच्छता मोहीम होणार असून जल संवर्धन प्रतिज्ञा झाल्यानंतर राजाराम बंधारा मार्गे इचलकरंजीकडे जलदिंडी रवाना होईल. सायंकाळी पाच वाजता इचलकरंजी येथे जलदिंडीची सांगता होईल.

पिरळ (ता. राधानगरी) येथे काल रात्रीपासूनच जलदिंडीच्या निमित्ताने रांगोळ्या सजल्या होत्या. सकाळी सहापासूनच परिसरातील भजनी मंडळांबरोबरच विविध वाद्यपथकांसह शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मांदियाळी अवतरू लागली आणि साऱ्यांच्याच अमाप उत्साहात व जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जलदिंडी उपक्रमाला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘‘लेकराच्या भविष्याची काळजी आई-वडील ज्या भावनेने घेतात त्याच भावनेने नद्या वाचविण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. लोकसहभागाबरोबरच प्रशासकीय पातळीवर पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी आवश्यक ते सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.’’

सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘अकरा वर्षांपूर्वी कोल्हापूरकरांनी पंचगंगा मोहीम हाती घेतली आणि त्यातून ‘एक मूठ रक्षा श्रद्धेसाठी, उर्वरित शेतीसाठी’ अशा विविध संकल्पना पुढे आल्या. त्या यशस्वीही झाल्या. मात्र, पंचगंगेची सद्य:स्थिती आणि भविष्यातील धोके ओळखून आता ती पुन्हा व्यापक होणार आहे. त्यात कोल्हापूरकरांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.’’

कार्यक्रमाला ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव, उप सरव्यवस्थापक रवींद्र रायकर, तहसीलदार मीना निंबाळकर यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मुख्य कार्यक्रमानंतर जल संवर्धन प्रतिज्ञा घेऊन भोगावती नदीतून जलदिंडीला प्रारंभ झाला.

पूर्णत्वाचा दाखला शोषखड्ड्यांशिवाय नाही

आपल्या घरातील सांडपाणी आपल्याच परिसरात निर्गत करण्यासाठी घरोघरी शोषखड्ड्यांवर आता गावांनी पुढाकार घेतला आहे. नवीन बांधकामांना शोषखड्डा असल्याशिवाय बांधकाम पूर्ण झाल्याचा परवाना न देण्याचा निर्णय आज पाडळी खुर्द आणि शिंगणापूर या गावांनी जलदिंडीवेळी जाहीर केला. या गावांसह आता नदी काठावरची इतर गावेही असाच निर्णय घेणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com