बारा एकरातील डाळिंब बागा भुईसपाट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे चिचोंडी, बदापूर भागात महिनाभरात चाळीस एकरातील डाळिंब बागा काढण्यात आल्या.

चिचोंडी - चिचोंडी (ता. येवला) परिसरात डाळिंब बागा काढून टाकण्याचे सत्र काही केल्या थांबेना. आटत चाललेल्या विहिरी, बाजारभावाचा गंभीर प्रश्‍न, मर-तेल्या रोगातून सावरताना खिळखिळी झालेली आर्थिक स्थिती, यामुळे पुन्हा बारा ते पंधरा एकरावरील बागा काढण्याचे काम बदापूर, चिचोंडी परिसरात सध्या सुरू आहे. 

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे चिचोंडी, बदापूर भागात महिनाभरात चाळीस एकरातील डाळिंब बागा काढण्यात आल्या. चिचोंडी बुद्रुक येथील अशोक घोटेकर यांनी सोमवारी (ता. 13) दोन एकरांतील सहा वर्षांची डाळिंब बाग जेसीबीद्वारे उपटून टाकली व या सहाशे झाडांची कुट्टी केली; तर बदापूर येथील माजी सरपंच सोमनाथ मोरे यांची फळ धरलेली अर्धा एकर आणि रघुनाथ काळे यांचा एक्‍स्पोर्ट माल उत्पादित होणारी दोन एकर बागदेखील काढण्यात आली. येथील अण्णा घोटेकर, मच्छिंद्र गुडघे, भागवत खराटे, शरद घोटेकर या शेतकऱ्यांनी दुष्काळाशी दोन हात केले खरे. मात्र, बाजारभाव नसल्याने केलेला खर्चसुद्धा बागेतून निघत नसल्याने डाळिंब बागेवर कुऱ्हाड चालवून बागा तोडल्या. 

मोठ्या कष्टाने फुलविलेला हा मळा डोळ्यांसमोर नष्ट करावा लागत असल्याचे विदारक चित्र आता परिसरात ठिकठिकाणी दिसू लागले आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला खरा. पण, एकही उपाययोजना लागू झालेली नाही. शासनाने या परिस्थितीत शेतकऱ्यांना पाठबळ देण्याची मागणीही होत आहे. युवा शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता डाळिंब लागवड केली. ठिबक संच, फिल्टर संच, पाइपलाइन, नळ्यासाठी सुमारे दीड लाखांवर खर्च, विहीर, बोअर, शेततळे, रोपवाटिकेतील भगवा जातीची डाळिंब रोपांची लागवड केली. झाडे वाढविली, फुलविली. दरम्यान, पाऊस कमी झाल्याने पाणी कमी पडू लागले अन्‌ बागा संकटात आल्या. मागील काही हंगामांत भाव गडगडल्याने हाती उत्पादन खर्चही आला नाही. त्यामुळे बाग तोडण्याचा कठोर निर्णय घेण्याची वेळ आली, असे सोमनाथ मोरे यांनी सांगितले. 

जमिनीतील पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने विहिरी कोरड्या पडत आहेत. बागा जगविण्यासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाल्याने बाग तोडण्याचा निर्णय घेतला. 
-अशोक घोटेकर, शेतकरी, चिचोंडी 

शासनाने फळबागा संकटात सापडल्यावर शेतकऱ्यांना भरपाई देणे गरजेचे आहे. मागील वर्षी गारांचा तडाखा व यावर्षी पडलेला कडक दुष्काळ, यामुळे शेतकऱ्यांबरोबरच बागाही होरपळल्या. त्यामुळे त्या काढल्या जात आहेत. 
-सोमनाथ मोरे, माजी सरपंच, बदापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate farm damage due to drought