ऑनलाईन शिक्षण कसं असावं? शिक्षकांनो, वाचा 'या' टिप्स!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

वर्गात उभे राहून लेक्‍चर देतो, तसे कॅमेऱ्यासमोर उभे राहून विद्यार्थ्यांना लेक्‍चर न देता, नव्यानव्या कृतीकार्यातून विद्यार्थ्यांना आनंदाने खिळवून ठेवू शकेल, असे शैक्षणिक साहित्य बनवून विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागातून अध्यापन-अध्ययन व्हायला हवे.

'कोविड- 19'मुळे उद्‌भवलेल्या सद्यपरिस्थितीत शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू ठेवायचे असल्यामुळे बहुसंख्य शाळांनी ऑनलाइन अध्यापनाचा अवलंब केला आहे. इंटरनेटद्वारे शिक्षण घेतले जाते ते ऑनलाईन शिक्षण. जिथे इंटरनेटची सोय आहे, अशा कुठल्याही ठिकाणी हे शिक्षण होऊ शकते. त्यामुळे शाळेत न जाता घरी सुरक्षित राहून विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत.

डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!

सध्याच्या काळात ऑनलाईन शिक्षण वरदानच ठरले आहे. परंतु असे ऑनलाईन अध्यापन करण्यासाठी आधी शिक्षकांना प्रशिक्षित करणे जरुरीचे आहे. पालक आणि विद्यार्थी यांचेसुद्धा याविषयी प्रबोधन करायला हवे. प्रत्यक्ष शाळेतील वर्गात शिकविण्याची पद्धत आणि ऑनलाईन शिक्षणाची पद्धत सारखी असूच शकत नाही! शैक्षणिक वातावरण हे दोन्ही बाबतीत वेगळे असल्याने शिकविण्याची पद्धत ही वेगळीच हवी. नाहीतर अध्यापन विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवू शकणार नाही, परिणामी ते परिणामकारक ठरणार नाही.

ऑनलाईन शिक्षण हे प्रत्यक्ष शिकविणे (प्रत्यक्षदर्शी) आणि पूर्वध्वनीमुद्रित असे संमिश्र असायला हवे. ऑनलाईन अध्यपन प्रत्यक्षदर्शी नसते, ते पूर्वध्वनीमुद्रित असते. या पद्धतीत शिक्षक स्वत: पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन किंवा व्हिडिओ बनवून वाचन साहित्य, ऍनिमेशन्स्‌, चित्र, तक्ते इत्यादी वापरून तसेच इंटरनेटवर उपलब्ध काही निवडक उपयुक्त व्हिडिओच्या लिंक्‍स देऊन एखादी संकल्पना समजावून देऊ शकतात. तर प्रत्यक्षदर्शी पद्धतीत थेट प्रक्षेपण असते. परंतु या पद्धतीत शाळेत असतात तशा एका पाठोपाठ एक तासिका घेणे अजिबात योग्य नाही. विद्यार्थ्यांबरोबर चर्चा घडवून आणण्यास, त्यांचे शंका निरसन करण्यास किंवा त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी अधून-मधून त्याच्याबरोबर संवाद साधण्यासाठी प्रत्यक्षदर्शी शिकविण्याची पद्धत वापरावी. पूर्वध्वनीमुद्रित आणि प्रत्यक्षदर्शी यांचा योग्य प्रमाणात वापर करून, आठवड्यातून मर्यादित वेळेसाठी ऑनलाईन अध्यापन करता येईल. त्यासाठी शाळा आणि शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

यंदा 'रक्षाबंधन' होणार ऑनलाईन; कोरोनाने बदलल्या सणांच्या प्रथा!

पूर्वध्वनीमुद्रीत ऑनलाईन अध्यापनाचे बरेचसे फायदे आहेत. एक म्हणजे, विद्यार्थी आपल्या गतीने अध्ययन करू शकतात. विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचा उपयोग ते वारंवार करू शकतात. त्यामुळे अध्ययन जास्त चांगले होते आणि ते लक्षातही राहते. एखादी शिकलेली संकल्पना दैनंदिन जीवनात कशी वापरली जाते, हे कळण्यासाठी विविध रंजक कार्यक्रम किंवा उपक्रम विद्यार्थ्यांना करायला दिल्यास आणि शिक्षकांकडून त्यांना वेळेत प्रतिसाद मिळाल्यास, आपण विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग निश्‍चित घडवून आणू शकतो. अजून एक मोठा फायदा म्हणजे, याला वेळेचे बंधन नाही. साधारण सर्व शाळांमध्ये विविध आर्थिक स्तरातील विद्यार्थी असतात. सर्वांच्याच घरी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असतोच असे नाही. स्मार्टफोन देखील कुटुंबामध्ये एखादाच असू शकतो. अशा परिस्थितीत पूर्वध्वनीमुद्रित अध्यापन असल्यास पालक आपल्या सोयीने पाल्याला स्मार्ट फोन किंवा लॅपटॉप कुठल्या वेळेला अध्ययनासाठी देणे शक्‍य आहे, ते ठरवू शकतात. शिवाय घरात भावंडे असतात तिथेही असे अध्यापन सोयीचे होते. 

याउलट प्रत्यक्षदर्शी किंवा थेट प्रसारण केल्यास इंटरनेट कनेक्‍टीविटीच्या समस्या येऊ शकतात. ऑनलाईन अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना खूप मेहनत घ्यावी लागते. नेहमीच्या प्रत्यक्ष वर्गात शिकविण्यापेक्षा या तयारीला कितीतरी जास्त वेळ द्यावा लागतो. दर्जेदार अध्यापन साहित्य बनविण्यासाठी स्वत:ची कल्पकता, इंटरनेटवर काम करायचा सराव आणि थोडेफार प्रभुत्व असायला हवे. मुख्य म्हणजे नवीन अध्यापन पद्धतीचा स्वीकार करण्याची मानसिकता हवी. गुरू किंवा आचार्यांची भूमिका सोडून विद्यार्थ्यांना पाठबळ देणारा सहाय्यक ही भूमिका घेण्याची तयारी हवी.

वर्गात उभे राहून लेक्‍चर देतो, तसे कॅमेऱ्यासमोर उभे राहून विद्यार्थ्यांना लेक्‍चर न देता, नव्यानव्या कृतीकार्यातून विद्यार्थ्यांना आनंदाने खिळवून ठेवू शकेल, असे शैक्षणिक साहित्य बनवून विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागातून अध्यापन-अध्ययन व्हायला हवे. असे साहित्य एखादे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम जसे की मायक्रोसॉफ्ट टिम्स्‌, गुगल क्‍लासरूम इत्यादी वापरून, अपलोड करून विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकते. याच माध्यमातून विद्यार्थी ते डाऊनलोड करू शकतात आणि स्वाध्याय करून शिक्षकांपर्यंत पोचवू शकतात.

पुण्यातील तरुण-तरुणींनी कसा केला 'फ्रेंडशिप डे' साजरा? वाचा सविस्तर

स्वाध्याय विचार करायला लावणारा, बुद्धीला चालना देणारा हवा. त्याच्यात विविधता असायला हवी. कधी वेब पेज डिझाइन करून, कधी पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन तर कधी दीर्घ उत्तर किंवा निबंध लिहून विद्यार्थी इंटरनेटद्वारेच स्वाध्याय शिक्षकांच्या अभिप्रायासाठी पाठवू शकतात. शिक्षक त्याचे मूल्यमापन करू शकतात. अशाने विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचा आणि अध्ययनाच्या निरनिराळ्या तऱ्हांचा आदर राखता येईल. कधी विद्यार्थ्यांचे गट बनवून, त्यांना एकत्रितपणे प्रकल्प करायला सांगता येईल. योग्य देवाण-घेवाणीतून शिक्षक आणि विद्यार्थी आपसातील सहयोगातून अध्ययन प्रक्रियेची निर्मिती करू शकतात. 

लहान गावातून किंवा खेड्यातून जिथे इंटरनेटची सुविधा नाही. तिथे रेडिओ आणि दूरदर्शनसारख्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रमांचा उपयोग करता येईल. राज्य सरकारने दिक्षा ऍप, शैक्षणिक दिनदर्शिका, जिओ टिव्ही, जिओ सावन यांसारख्या शैक्षणिक ऍप्सची निर्मिती केली आहे. स्मार्ट फोनवर हे ऍप डाऊनलोड करून विद्यार्थी त्यांचा लाभ घेऊ शकतात.
ऑनलाइन शिक्षण विद्यार्थी केंद्रीत आणि त्यांना स्वयंअध्ययनाकडे नेणारे ठरू शकते. मात्र प्रत्यक्ष शिक्षक-विद्यार्थी यांमधील संवाद इथे होऊ शकत नाही. विद्यार्थी स्वयंप्रेरित आणि स्वत:च्या अध्ययनाची जबाबदारी घेणारा असला तरच ते उपयुक्त ठरू शकते. शिवाय विद्यार्थ्यांच्या घरातील सदस्यांना आणि स्वत: विद्यार्थ्यांला स्मार्ट फोन, लॅपटॉप यांसारखी साधने योग्य रितीने हाताळण्याचे तंत्र अवगत असायला हवे. काही घरात तसे वातावरण नसते. त्यामुळे विशेषत: शालेय शिक्षणाच्या बाबतीत ऑनलाईन अध्यापनाकडे पूर्णपणे प्रत्यक्ष अध्यापनाला पर्याय म्हणून न बघता, प्रत्यक्ष अध्यापनाच्या जोडीला पूरक म्हणून त्याचा वापर करणे जास्त चांगले आहे.

Image may contain: 1 person, sitting and indoor

- पूर्णा विध्वंस, संचालक, न्यू इंडिया स्कूल, कोथरूड

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poorna Vidwans write an article about Online eduaction in Corona pandemic