#PositiveSakal हे आहे महाराष्ट्राचे प्रेरणादायी भविष्य..!

Positive Story of SSC Students
Positive Story of SSC Students

आजूबाजूला निराशाजनक वातावरण आहे.. राजकारणात रोज कुणीतरी कुणालातरी पायात पाय घालून पाडायचा प्रयत्न करतोय.. रस्त्यातल्या खड्ड्यांपासून महागलेल्या भाजीपर्यंत सगळीकडून वैतागच हाती येतोय.. भले भले लोक इथे रोज खांदे पाडून चालताना दिसतायत.. आणि दहावी-बारावीतली ही कोवळी पोरं सगळी नकारात्मकता दूर ढकलून ठामपणे स्वत:ची वाट निर्माण करत आहेत.. आई-वडिलांच्या कष्टाची जाण असणं, कुटुंबाच्या परिस्थितीचा अडथळा मागे टाकून या विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिद्ध करण्याची पहिली शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.. त्यांच्यापैकी अनेकांना 90-95 टक्के मिळाले नसतील; पण प्रत्येकाची लढाई वेगळी असते.. या मुलांनी ही लढाई जिंकली आहे. या छोट्या दीपस्तंभांकडून आपणही थोडा प्रकाश घेण्याची गरज आहे.. 

कचरावेचक महिलेच्या मुलीला 90 टक्के 
पुणे : "माझं आयुष्य कचरा वेचण्यात गेलं.. मी केलेलं काम माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नये, अशी इच्छा होती. माझ्या मुलींनी शिकावं, स्वत:च्या पायावर उभं राहावं, असं वाटायचं.. आज त्यांनी माझं स्वप्न साकारलं..' पाणावलेल्या डोळ्यांनी शोभा राजगुरु सांगत होत्या. त्यांची मुलगी गौरीश हिने दहावीच्या परीक्षेत 90 टक्के मिळविले आहेत. 

शेतकरी कुटुंबातील साहिलचे यश 
रत्नागिरी : बेलसई-खांबेवाडीतील एका शेतकरी कुटुंबातील साहिल धाडवे याला दहावीत 90.40 टक्के गुण मिळाले आहेत. परीक्षा झाल्या झाल्या त्याने पुणे गाठले. एका व्यावसायिकाकडे काम करून पुढच्या शिक्षणासाठी तो आर्थिक तजवीज करत आहे. त्याला विज्ञान शाखेतून शिक्षण घ्यायचं आहे; पण पुण्यात विज्ञान शाखेचे रात्र महाविद्यालय नाही. म्हणून तो आता वाणिज्य शाखेच्या रात्र महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा विचार करत आहे. 

रात्रशाळेनं दाखविली प्रकाशाची वाट! 
पुणे : अपंगत्वामुळे हातानं लिहिता येत नाही.. बोलणंही अडखळतच.. आधाराशिवाय उभंही राहता येत नाही.. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येही चिन्मय मोकाशीनं पहिल्याच प्रयत्नांत यश मिळविले आहे. दिवसभर हायड्रो थेरपी, व्यायाम आणि रात्रीची शाळा या दिनचर्येतून चिन्मयने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याला 53.40 टक्के गुण मिळाले आहेत. पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या इतर विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत चिन्मय मागे असेलही; पण त्यानं स्वत:ची परिस्थितीविरुद्धची स्पर्धा जिंकली आहे.. 

हॉटेलमध्ये काम; तरीही शिक्षणाशी नातं कायम! 
पुणे : जुन्नरमधील एका शेतकरी कुटुंबातील्ल देवल पवार शिक्षणासाठी पुण्यात आला. आर्थिक स्थितीमुळे त्यानं काम शोधायला सुरवात केली. एका हॉटेलमध्ये तो वेटर म्हणून कामाला लागला. दिवसभर हॉटेलमध्ये काम आणि रात्रशाळेत अभ्यास! त्यानं यंदा दहावीची परीक्षा दिली आणि 57.20 टक्के गुण मिळविले. 

वय वर्षं 24; शिक्षण : दहावी पास!
खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या वैष्णवी भोरे हिने वयाच्या 24 व्या वर्षी दहावीची परीक्षा दिली. 'दहावी उत्तीर्ण व्हायचंच' हा ध्यास घेत तिने 56 टक्के गुण मिळविले आहेत. 

वेदपठण..रात्रशाळा आणि दहावी! 
घरात वेदशास्त्राची परंपरा असलेला स्वानंद जोशी दिवसभर वेदपठण करतो. रात्री नियमित शिक्षणाचे धडेही तो घेतो. वेदशास्त्राचा अभ्यास करता करता त्याने दहावीत 75 टक्के गुण मिळविले आहेत. 

अन्‌ वैष्णवीने पैजही जिंकली 
पिंपरी : खेळ आणि अभ्यास यांचं संतुलन राखणं ही तारेवरची कसरत असते. दहावीच्या परीक्षेची तयारी करतानाच गोल्डकोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वैष्णवी जगतापने अपंग खेळाडूंच्या 'एस-8' गटात सातवे स्थान मिळविले होते. दहावीतही तिने सहा विषयांत 500 पैकी 414 गुण मिळविले आहेत. याशिवाय क्रीडा क्षेत्रातील प्राविण्याबद्दल तिला 20 गुणही मिळाले आहेत. 'परीक्षा तोंडावर असताना आजारपणामुळे वैष्णवीला महिनाभर दवाखान्यात राहावे लागले. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ती दोन महिने गुंतून पडली होती. 75 टक्के गुण मिळविल्यास पाच हजार रुपये आणि त्यापुढील प्रत्येक टक्‍क्‍यास एक हजार रुपये बक्षीस देण्याचे मी तिला कबूल केले होते. आता मी तिला पैजेनुसार रक्कम देणार आहे', असे तिचे वडिल विनोद जगताप सांगत होते.. 

जिद्दीनं शिकला आणि यश मिळविले..! 
पिंपरी : मेंदूच्या पक्षाघाताचा आजार असलेल्या स्वराज चव्हाणला दहावीत 80 टक्के मिळाले आहेत. 'पाचवीपर्यंत मी त्याला घरीच 'ई बुक'च्या माध्यमातून शिकवले. 2010 पासून चिंचवड येथील 'झेप' संस्थेत आणि रहाटणी येथील भिकोबा तांबे मेमोरिअल स्कूलमध्ये स्वराजचे शिक्षण झाले. त्याला मानसोपचारतज्ज्ञ व्हायचे आहे', असे स्वराजची आई वैशाली यांनी सांगितले. 

दु:ख बाजूला सारून दिली परीक्षा 
कोल्हापूर : घरची परिस्थिती बेताचीच.. अभ्यासासाठीच्या किमान आवश्‍यक सुविधाही तिच्याकडे नव्हत्या.. त्यातच वडिलांचेही निधन झाले. घराची सारी जबाबदारी आईवर पडली. तिच्या बोर्डाच्या परीक्षेची फीही तिच्या सर्व शिक्षकांनी भरली. या सगळ्या प्रतिकुलतेवर मात करत साक्षी लाडने 90 टक्के गुण मिळविले. 

परिस्थितीची जाण ठेवत केला अभ्यास 
कोल्हापूर : उत्तरेश्‍वर पेठेत एका छोट्या खोलीत राहणाऱ्या अमृता पाष्टेची आई भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात देवीला अर्पण केलेले खण, साड्या, ब्लाऊज पीस वेगळे करण्याचे काम करतात.. तिचे वडिल चांदी काम करतात. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत अमृताने कसून अभ्यास केला. तिने 92.80 टक्के गुण मिळविले. 

साजमा पठाणला संस्कृतमध्ये 83 गुण 
उचगाव : येथील साजमा आसीफ पठाण या अतिशय सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीने 83 टक्के गुण मिळविले. तिचे वडील घाटगे पाटील इंडस्ट्रीमध्ये काम करतात; तर आई गृहिणी आहे. घरी कोणतीही शैक्षणिक पार्श्‍वभूमी नाही. विशेष म्हणजे, तिने संस्कृत हा विषयही घेतला होता. त्यात तिने 83 गुण मिळविले आहेत. 

पहाटे पेपर टाकायचा.. मग अभ्यास! 
दौलतनगर : तीन बत्ती चौकात राहणाऱ्या रोहन दुर्गाप्पा कुराडे याचे वडील गवंडीकाम करतात. घरची परिस्थिती बेताचीच! काम केल्याशिवाय शिक्षण घेणे शक्‍य नाही, याची जाणीव त्याला होती. म्हणून पहाटे पेपर टाकायचे काम त्याने सुरू केले. ते काम झाल्यावर अभ्यास आणि मग शाळा, अधूनमधून गवंडीकामातही मदत करायचा.. काम आणि अभ्यास सांभाळून रोहनने 67.20 टक्के गुण मिळविले. 

भेळेची गाडी सांभाळत अभ्यास! 
आई, वडील, भाऊ आणि मोठी बहीण असा सीमा सोहन काटका हिचा परिवार आहे. मुक्त सैनिक वसाहतीजळ त्यांची भेळेची गाडी आहे. सीमा या कामात घरच्यांना मदत करते. सकाळी अभ्यास, दुपारी शाळा आणि संध्याकाळी घरातील काम असे करून सीमाने 86 टक्के गुण मिळविले. 

शिकता शिकता त्याची 'मास्तरकी'ही! 
नाशिक : पितृछत्र नाही.. आई अंथरुणावर खिळलेली.. घरची नादारी.. शिक्षणाची गोडी आणि गतीतून शिकता शिकता दहावीचा अभ्यास करणारा ओमकार कदम चक्क मास्तरकी करू लागला. एकूण 85 टक्के गुण त्याने मिळविले. ओमकार चौथीत असताना त्याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. कौटुंबिक जबाबदारी आईवर असताना तिलाही शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले. मावशीने ओमकारचा सांभाळ करत शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. नववीत त्याला गणितामध्ये 52 गुण होते. दहावीला त्याला याच विषयात 94 गुण मिळाले. याच विषयाचे तो इतर विद्यार्थ्यांना धडेही देऊ लागला होता. 

खुशालची भरारी 
देवळा : पितृछत्र हरपलेले असताना आईचे स्वप्न पूर्ण करण्याच्या इच्छेने खुशाल भाऊसाहेब निकम याने दहावीत 90 टक्के गुण मिळविले. वडिलांच्या मृत्यूचे दु:ख पचवत, आईला शेतीत मदत करत आणि रोज चार किलोमीटरचा सायकलचा प्रवास करत त्याने हे यश मिळविले. 

दु:खाचा डोंगर कोसळला; तरीही तो उभा राहिला 
सातारा : इंग्रजीची परीक्षा सुरू.. परीक्षा संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी आली.. संध्याकाळी वडिलांच्या पार्थिवास अग्नी दिला.. रक्षाविसर्जन करून पुन्हा बीजगणिताची परीक्षा दिली. दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतरही अमोल जाधवने दहावीची परीक्षा दिली. 49.60 टक्के गुण मिळवित अमोल उत्तीर्ण झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com