राज्यात पुन्हा पूर्वमोसमी पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुणे - राज्यात पुन्हा पूर्वमोसमी पावसाचे ढग दाटून येतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. येत्या रविवारी (ता. 15) मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे. 

पुणे - राज्यात पुन्हा पूर्वमोसमी पावसाचे ढग दाटून येतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. येत्या रविवारी (ता. 15) मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे. 

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कमी होत नाही, तोच बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या परिसरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्‍यता आहे. गेल्या आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याचबरोबर बाष्पही या भागावरून वाहत होते. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात जोरदार वारा वाहून मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडला. मात्र, कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस झाला नाही. आता पुन्हा पूर्वमोसमी पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली. 

विदर्भात येत्या शुक्रवारी (ता. 13) आणि शनिवारी (ता. 14) तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता असून, उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. 

कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

सर्वाधिक तापमान चंद्रपूरला 
राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 41.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यातील कमाल तापमानाचा पारा सरासरी इतका म्हणजे 37.6 अंश सेल्सिअस नोंदला गेला. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा अंशतः वाढला, तर विदर्भात ढगाळ वातावरणामुळे दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा कमी झाले, असे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले. 

Web Title: The possibility of pre-monsoon rains again in the state