मुदतपूर्व निवडणुकीची शक्‍यता धूसर 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 मार्च 2017

मुंबई - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे राज्यात पडसाद उमटणार असून, यापुढे शिवसेनेला जपून पावले टाकावी लागणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या विक्रमी यशामुळे राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारबाबतची अस्थिरता धूसर झाली आहे. 

मुंबई - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे राज्यात पडसाद उमटणार असून, यापुढे शिवसेनेला जपून पावले टाकावी लागणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या विक्रमी यशामुळे राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारबाबतची अस्थिरता धूसर झाली आहे. 

भाजपला उत्तर प्रदेशमध्ये जबरदस्त यश मिळाले. त्यामुळे राज्यातील राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. सत्तेत राहून केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या शिवसेनेला यापुढे सावध खेळी करावी लागणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोपांचे तुंबळ युद्ध रंगले. राज्य सरकार नोटीस पीरिएडवर, तर शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत आसल्याचे चित्र निर्माण झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुदतपूर्व निवडणुकीची भाषा केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस सरकारला धोका निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती. 

त्यातच मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवड आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरणात उलथापालथ होईल, असे भाकीत राजकीय जाणकार व्यक्त करत होते. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा पराभव झाला असता, तर राज्यात भाजपच्या संकटात वाढ झाली असती. शिवसेनेने आपल्या विरोधाची धार बळकट केली असती. देशातील मोदी लाट केव्हाच ओसरली असल्याची पक्की खात्री शिवसेनेसह इथल्या सर्व सरकारविरोधी पक्षांची झाली असती; मात्र उत्तर प्रदेशमध्ये याउलट घडल्याने राज्यात विरोधकांसह सत्तेतील जोडीदार आणि भाजपचा विरोधक बनलेल्या शिवसेनेला आता आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल. आगामी विधानसभा निवडणुकीला अद्याप अडीच वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे सरकारमधून बाहेर पडण्याची पावले तकाळ उचलणे हे धाडस शिवसेना लगेच करणार नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे राज्यात मुदतपूर्वची शक्‍यता नाही; मात्र देशातील जनतेचा "मूड' काय आहे, आपण पाहिलेय हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान राज्य सरकारच्या स्थिरतेची पावती देत असल्याचे मानले जाते. 

Web Title: The possibility of pre-term elections