राज्यात पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

पुणे - मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी सुसाट वारा वाहण्याची शक्‍यता आहे. त्याचवेळी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविला. राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक म्हणजे 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पुणे - मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी सुसाट वारा वाहण्याची शक्‍यता आहे. त्याचवेळी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविला. राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक म्हणजे 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या भागांत पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर परिसरात पावसाच्या सरी पडल्या. कोल्हापूर शहरासह आजरा, कागल, करवीर, हातकणंगले, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, भुदरगड, मलकापूर भागात शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. सांगलीसह वाळवा, शिराळा आणि खानापूर येथे पाऊस; तर शिराळ्या तालुक्‍यातील काही भागांत गारपीट झाली. सोलापूर जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसल्या. स्थानिक वातावरणाचा परिणाम म्हणून हा पाऊस पडत असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

ढगाळ हवामानामुळे दमटपणा वाढला असून कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे; तर राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

मध्य प्रदेशच्या मध्य भागात चक्राकार वाऱ्याचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे; तसेच विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या अंतर्गत भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येत्या शनिवारी (ता. 6) कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार आहे. 

येत्या रविवारी (ता. 7) मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. सोमवारी (ता. 8) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मंगळवारी (ता. 9) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता असून उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुणे परिसरातही शनिवारी ढगाळ हवामान राहणार असून, शनिवारपासून आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्‍यता आहे. 

राजस्थानमध्ये पावसाच्या सरी 
राजस्थानच्या वायव्य भागात शुक्रवारी पावसाच्या सरी पडल्या. त्यामुळे तेथील उष्णतेची तीव्रता कमी झाली असून, तेथून उष्ण आणि दमट वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत उष्णतेची लाट निर्माण झाली होती. या पावसामुळे उष्ण वाऱ्याची तीव्रता कमी होईल, अशी शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे. 

Web Title: The possibility of rain in the state