राज्यात आजपासून पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची तीव्रतादेखील कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान असल्यामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे.

पुणे : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची तीव्रतादेखील कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान असल्यामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे.

मागील आठवड्यात निरभ्र आकाशामुळे थंड वाऱ्याचा प्रभाव काहीसा वाढला होता. परिणामी थंडीचा कडाका जाणवू लागला होता. मात्र, आठवड्याच्या अखेरीस पुन्हा ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ तीव्र कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले असून, त्याची तीव्रता कमी होण्याचे चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात हिंदी महासागरामध्ये कमी दाब क्षेत्र नव्याने निर्माण झाले असून, त्याची तीव्रता वाढण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण राहण्याचे संकेत आहेत. दरम्यान, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. 

आज व उद्या पावसाची शक्‍यता 
कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोमवारी (ता. 19) आणि मंगळवारी (ता. 20) पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. बुधवारनंतर (ता.21) गोव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे होईल. पुण्यातही सोमवारी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

Web Title: possibility of rain from today in the state