पोस्टमनचा संप स्थगित प्रशासनाकडून मागण्या मान्य 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

राज्यातील पोस्टमन वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बहुतेक मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे गुरुवारपासून (ता. 9) सुरू होणारा पोस्टमनचा संप स्थगित करण्यात आला आहे. 

मुंबई - राज्यातील पोस्टमन वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बहुतेक मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे गुरुवारपासून (ता. 9) सुरू होणारा पोस्टमनचा संप स्थगित करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात अनेक वर्षे बंद असलेली पोस्टमन व एमटीएस वर्गातील कर्मचाऱ्यांची भरती सुरू करावी. त्यांना वेतनवाढ तसेच थकबाकी द्यावी आदी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनने 9 मेपासून संपावर जाण्याची नोटीस दिली होती. या संपामुळे राज्यातील टपाल सेवा विस्कळित होण्याची शक्‍यता होती. या मागण्यांसाठी टपाल कर्मचाऱ्यांनी नुकतेच मध्यवर्ती टपाल कार्यालयासमोर (जीपीओ) धरणे आंदोलनही केले होते. 

या पार्श्‍वभूमीवर टपाल प्रशासन आणि संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या चर्चेत कर्मचाऱ्यांच्या बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या. पोस्टमन व एमटीएस भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात दोन कंपन्यांचे प्रस्ताव आले आहेत. संचालनालयाकडून मंजुरी मिळाल्यावर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. पोस्टमन व मेलगार्ड यांच्या वेतनातील तफावतीची थकबाकी दिली जाईल. वेतन निश्‍चितीला झालेल्या विलंबाबाबत चौकशी करून जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. 

ई-कॉमर्सच्या माध्यमातून येणारी पार्सल पोहोचवण्यातील त्रुटींबाबत कर्मचारी संघटनेने अभ्यास करून प्रशासनाला माहिती द्यावी. त्यानंतर चर्चा करून उपाययोजना केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. अन्य कामगारांचे वेतन वाढवण्यात येईल; त्या संदर्भातील पत्र प्रत्येक विभागीय मंडळ कार्यालयाने पाठवले आहे. त्यानुसार कार्यवाहीबाबतही एकमत झाले. 

थकबाकीचे वाटप सुरू 
पाचव्या वेतन आयोगाची थकबाकी (दीड लाख ते तीन लाख रुपये) काही टपाल कार्यालयांतील पोस्टमनना मिळण्यास मंगळवारपासून (ता. 7) सुरुवात झाली. ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनतर्फे ही माहिती देण्यात आली. 

चर्चेनंतर प्रशासनाने बहुतेक मागण्या मान्य केल्या. या मागण्या ठरलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्यास संघर्ष सुरूच राहील. 
- राजेश सारंग, मंडळ सचिव, ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Postman strike postponed