पोस्टमन होणार डिजिस्मार्ट! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

डिजिटल इंडिया या मोहिमेचा भाग म्हणून ‘पोस्टमॅन’ ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. हे ॲप राज्यातील ७३३० पोस्टमनना दिले जाणार आहे.

मुंबई -  आता कुरिअर बॉयप्रमाणे पोस्टमनही डिजिटली स्मार्ट होणार आहे. एखादे पत्र किंवा पार्सल देताना पोस्टमन कागदावर आपली सही घेतात. ही कागदी पोचपावती आता हद्दपार होणार असून, सर्व कामकाज डिजिटल होईल. त्यासाठी टपाल विभागाने ‘पोस्टमॅन’ ॲपची निर्मिती केली आहे. त्यामुळे पोस्टमन काका घरोघरी पत्र, पार्सल दिल्यावर स्मार्टफोनवरच सही घेऊन पोचपावती देतील.

डिजिटल इंडिया या मोहिमेचा भाग म्हणून ‘पोस्टमॅन’ ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. हे ॲप राज्यातील ७३३० पोस्टमनना दिले जाणार आहे. साध्या पत्रापासून स्पीडपोस्ट, रजिस्टर, मनीऑर्डर, पार्सल अशा सर्वांची पोचपावती स्मार्टफोनमधील या ॲपद्वारे घेतली जाईल. ॲपवर घेतलेला ‘डाटा’ लगेच टपाल विभागाच्या सर्व्हरला पाठवला जाईल. हा तपशील ग्राहकांना टपाल विभागाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. पाठवलेले पार्सल किंवा पत्र कुठे गेले, कधी पोचवले, याची माहिती काही मिनिटांत ग्राहकांना संकेतस्थळावर दिसेल.

याआधी पोस्टमनना पोचपावतीचे तपशील सायंकाळी टपाल कार्यालयात जाऊन द्यावे लागायचे. त्यानंतर ते तपशील सर्व्हरवर अपलोड व्हायचे. पोस्टमॅन ॲपमुळे हा तपशील त्वरित सर्व्हरवर अपलोड होईल आणि ग्राहकांना आपले पत्र किंवा पार्सलचे ट्रॅकिंग करता येईल.

पोस्ट बॅंकेची  ७५ एटीएम
पोस्ट ऑफिस सेव्हिंग बॅंकेची सेवा घेणाऱ्या ग्राहकांसाठी राज्यात ७५ एटीएम बसविण्यात आली आहेत. या एटीएममध्ये टपाल खात्याबरोबर इतर बॅंकांचीही एटीएम कार्ड स्वीकारली जात आहेत. पोस्ट बॅंकेचे एटीएम कार्ड आता अन्य बॅंकांच्या एटीएममध्ये वापरता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Postman Will DigiSMart

टॅग्स