VIDEO : सायबर हल्ल्यामुळे खरंच पॉवर ग्रीड फेल होऊ शकते का? वाचा स्पेशल रिपोर्ट

भाग्यश्री राऊत
Wednesday, 3 March 2021

मुंबईवर सायबर हल्ला झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसतात. राज्य सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी हे सर्व करत असल्याचा आरोपही केला जातोय. तर मग खरंच सायबर हल्ल्यामुळे पॉवर ग्रीड फेल होऊ शकते का? याबाबत आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : गेल्या वर्षी मुंबई आणि उपनगरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. आता याबाबत न्यूयॉर्क टाईम्सने धक्कादायक खुलासा केला आहे. मुंबईतील ब्लॅकआऊट ही तांत्रिक बाब नसून त्यामागे चीनचा सायबर हल्ला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या बाबीची दखल घेतली असून राज्याच्या सायबर सेलला अहवाल मागविला आहे. त्यानुसार हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसतात. राज्य सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी हे सर्व करत असल्याचा आरोपही केला जातोय. तर मग खरंच सायबर हल्ल्यामुळे पॉवर ग्रीड फेल होऊ शकते का? याबाबत आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - कोरोनाचा उद्रेक! मिनी लॉकडाऊननंतर आता ८ मार्चपर्यंत...

न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनी हॅकर्सने ऑक्टोबर २०२० मध्ये पाच दिवसांत भारतातील पॉवर ग्रीड, आयटी कंपनी आणि बँकींग क्षेत्रावर ४० हजार ५०० वेळा सायबर अटॅक केला होता. भारतातील पॉवर ग्रीडविरोधात चीनने मोठे अभियान चालविले होते. त्यावेळी गलवान खोऱ्यामध्ये जी झटापट झाली होती. त्यावेळी भारताने चीनविरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली. भारत सीमेवर जर चीनविरोधात कारवाई करत असेल, तर भारतातील अनेक पॉवर ग्रीडवर मालवेअर अटॅक करून त्यांना बंद करू, असे चीनचे नियोजन असल्याचे त्या वृत्तामध्ये दिले आहे.

न्यूयॉर्क टाईम्सचा दावा जर खरा असेल तर खरंच पॉवर ग्रीडवरही सायबर हल्ला होऊ शकतो का? असा प्रश्न आम्ही सायबर तज्ज्ञ श्रीकांत अर्धापूरकर यांना विचारला असता, 'हो...पॉवर ग्रीडवर सायबर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे एक शहर, राज्य किंवा देशामध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट होऊ शकतो. पॉवर ग्रीडमध्ये SCADA नेटवर्क काम करत असते. ते एक ऑटोमेशन सिस्टम आहे.  म्हणजेच एखाद्या ठिकाणी कधी वीज पुरवठा करायचा आहे, किती वीज पुरवठा करायचा आहे? फ्रिक्वेंन्सी वाढली तर काय करायचं? हे सर्व काम SCADA मधून हाताळलं जातं. जर SCADA मध्ये वापर होत असलेल्या संगणकाचा अॅक्सेस हॅकर्सला मिळाला तर संपूर्ण यंत्रणा हॅक होऊ शकते.', असं अर्धापूर सांगतात. 

हेही वाचा - बापरे! गृहविलगीकरणातील रुग्णाचा मुक्तसंचार, तपासणी पथकाकडून दंडात्मक कारवाई

चायनीज हॅकर्स सरकारी आयपी अ‌ॅड्रेसला स्कॅनिंग करतात.  स्कॅन करताना त्यांना जिथे जिथे सरकारचे आय़पी अ‌ॅड्रेस मिळतात तिथे ते हॅकर्स मालवेअर टाकतात. एकदा तो मालवेअर सिस्टममध्ये गेला की तो त्या हॅकर्सला संबंधित यंत्रणेची माहिती पाठवत असतो. एक किंवा अर्ध्या दिवसांच्या स्कॅनिंगमध्ये समजते, की संबंधित नेटवर्क कुठलं काम करतं? जेव्हा त्यांना संबंधित नेटवर्कची माहिती मिळते त्यावेळी ते त्या नेटवर्कला ऑपरेट करणे सुरू करतात. अशाप्रकारे त्या चायनीज हॅकर्सने मुंबईच्या पॉवर ग्रीडचे नेटवर्क स्कॅन केले आणि ते कशाप्रकारे हाताळतात? याबाबत माहिती गोळा केली असावी. त्यानंतर मालवेअर सक्रीय करून त्यांनी एका निश्चित वेळेसाठी ब्लॅकआऊट केला असावा, असे अर्धापूरकर यांचे म्हणणे आहे. 

काय काळजी घ्यायला हवी? -
महाराष्ट्रामध्ये SCADA यंत्रणा आहे. परंतु, ती मॅन्युअली काम करते. तर मग सायबर हल्ला कसा काय होऊ शकतो? असा सवाल माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. मात्र, आपल्याकडे SCADA मध्ये आर्टीफिशीअल इंटलिजन्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच वापर केला जात नाही. त्यामुळे त्याला ऑपरेट करणारे हे कर्मचारी असतात. ज्याठिकाणी मानवी हस्तक्षेप होतो त्याठिकाणी चुका होत असतात. आर्टीफिशीअल इंटलिजन्स असेल तर संबंधित सिस्टम येणारे अलर्ट, मेसेज स्वतः डिकोड, अॅनालिसिस करून सायबर हल्ले रोखू शकते. मात्र, आपल्याकडे मॅन्युअली ते हाताळले जात असल्याने हा सायबर हल्ला रोखता आला नसावा, असे अर्धापूरकर यांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा - वाद गेला विकोपाला; पत्नी तक्रार द्यायला ठाण्यात गेली, इकडे पतीने रागात केली चिमुकलीची हत्या

नेमके काय घडले होते मुंबईमध्ये? 
12 ऑक्टोबर 2020 सकाळीच मुंबई शहरातली बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. 10 वाजून 15 मिनिटांनी वीज पुरवठा बिघाडाच्या या प्रकरणाची नोंद शहराला वीज पुरवठा करणाऱ्या बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट या कंपनीने घेतली होती. तोपर्यंत मुंबई महानगर, पश्चिम आणि मध्य उपनगरं त्याचबरोबर ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी या शहरांपर्यंत वीज पुरवठा खंडित झालेला होता आणि त्याचा फटका उपनगरी रेल्वेसेवा, शहरातील अत्यावश्यक सेवा, रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणेलाही बसला होता. तसेच त्या काळात मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्णसंख्या वाढतच होती. त्यामुळे व्हेंटीलेटर्सवर असणाऱ्या रुग्णांवरही याचा परिणाम झाल्याची ओरड झाली. सर्व यंत्रणा कोलमडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: is power grid failed by cyber attack special report nagpur news