नवे नेपथ्य देणारी निवडणूक!

प्रकाश अकोलकर
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

विलेपार्ल्यातील पोटनिवडणूक ही शिवसेनेनं तत्कालीन महापौर रमेश प्रभू यांना उभं करून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू हैं!’ ही घोषणा घराघरांत पोचवली. निवडणूक अर्थातच शिवसेनेनं जिंकली होती.

विलेपार्ल्यातील पोटनिवडणूक ही शिवसेनेनं तत्कालीन महापौर रमेश प्रभू यांना उभं करून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू हैं!’ ही घोषणा घराघरांत पोचवली. निवडणूक अर्थातच शिवसेनेनं जिंकली होती.

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर नवं नेपथ्य नेमकं कधी उभं राहिलं? राजकारणात मुरलेली नेतेमंडळी या प्रश्‍नाची अनेक उत्तरं आपापल्या पद्धतीनं देतीलही; पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज आरपार बदलून सर्वार्थानं नवं नेपथ्य उभं राहिलं, ते १९९० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतूनच! 

संयुक्‍त महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली आणि या नव्या राज्याची सूत्रं यशवंतराव चव्हाण यांच्या हाती आली. संयुक्‍त महाराष्ट्र समितीचा तेव्हा मोठा दबदबा होता आणि त्यामुळे यशवंतरावांपुढे मोठं आव्हान होतं. मात्र, कॉ. श्रीपाद अमृत (एस. ए.) डांगे, एस. एम. जोशी, आचार्य अत्रे आदी बलदंड नेते समितीचं नेतृत्व करीत असूनही, अल्पावधीतच समितीत फूट पडली. त्याच वेळी यशवंतरावांचं बेरजेचं राजकारण राजकारणात मुरू पाहत होतं आणि १९६२ मध्ये राज्य स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसनं ११५ जागा जिंकत, ५१ टक्‍के मतं घेऊन आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. यशवंतरावांवर पंडित नेहरू यांच्या उदारमतवादाचा आणि लोकशाही विचारांचा पगडा होता. कारभार उत्तम सुरू होता. मात्र, दोनच वर्षांत यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला जावं लागलं. पुढे मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील असे मुख्यमंत्री झाले; तरी राज्य महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या विचारांनीच चालत होतं. लोकशाही स्वातंत्र्य तसंच सेक्‍युलॅरिझम हा कारभाराचा गाभा होता.

पुढे इंदिरा गांधी यांच्या एकाधिकारशाहीला शह देण्यासाठी शरद पवार यांनी १९७८ मध्ये जनता पक्षाच्या पाठबळावर सरकार स्थापन केलं. तरीही हे नवं बिगरकाँग्रेस सरकारही गांधी-नेहरूंच्याच विचारांनी चालत होतं. काँग्रेसनं समाजवादाचा वसा घेतला होता आणि काँग्रेसमधून बाहेर पडून सरकार बनविल्यावरही पवारांनी तो घेतला वसा सोडला नव्हता. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही दैवतं होती आणि विचारधाराही सेक्‍युलॅरिझमचीच होती.

या विचारधारेला शह देण्याचं काम १९९० मध्ये झालेल्या निवडणुकीनं केलं. त्यास पार्श्‍वभूमी होती ती १९८७ मध्ये विलेपार्ले या मुंबईच्या उपनगरात झालेल्या एका पोटनिवडणुकीची! त्याआधी १९८५ मध्ये झालेल्या निवडणुकीत पवारांनी ‘पुरोगामी लोकशाही दल’ (पुलोद) या नावानं आघाडी उभी केली होती आणि जनता, शेतकरी कामगार पक्ष यांच्याबरोबर पाचच वर्षांपूर्वी स्थापन झालेला भारतीय जनता पक्ष यांना सोबत घेऊन पवारांनी ही मोट बांधली होती. विलेपार्ल्यातील पोटनिवडणूक ही शिवसेनेनं तत्कालीन महापौर रमेश प्रभू यांना उभं करून, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू हैं!’ ही घोषणा घराघरांत पोचवली. निवडणूक अर्थातच शिवसेनंनं जिंकली होती. त्यानंतर लगोलग भाजपनं ‘पुलोद’शी काडीमोड घेऊन शिवसेनेशी घरोबा करण्याचा निर्णय घेतला. त्या युतीचे शिल्पकार अर्थातच प्रमोद महाजन होते. शिवसेनेबरोबर गेलं नाही तर महाराष्ट्रात आपलं नामोनिशाण राहणार नाही, हे ओळखणारे महाजन हे भाजपचे पहिले नेते! १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकाही या ‘युती’नं लढवल्या आणि भाजपचे १०, तर शिवसेनेचे दोन खासदार विजयी झाले. मात्र, ‘युती’नं खरा चमत्कार करून दाखवला तो १९९० च्या विधानसभा निवडणुकीत. त्या वेळी शिवसेनेचे ५२, तर भाजपचे ४२, असे एकूण ९४ आमदार मोठ्या रुबाबाने सभागृहात जाऊन बसले होते. ‘युती’च्या पारड्यात मतंही २६ टक्‍के पडली होती, तर काँग्रेसनं ३८ टक्‍के मतं घेत १४१ जागा जिंकल्या होत्या.

महाराष्ट्रानं या निवडणुकीत प्रथमच उजव्या आणि मुख्यत्वे हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षाला विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून कौल दिला होता. गांधी-नेहरूंच्या समाजवादी तसेच निधर्मी विचारांना बसलेला हा मोठाच शह होता. ठाकरे, महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचं राज्याच्या राजकारणातील वर्चस्व या निकालांमुळे कमालीचं वाढलं होतं आणि राज्याचं राजकीय नेपथ्यही आरपार बदलून गेलं होतं.

(क्रमश:)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash akolkar article politics