भाजप, आरएसएस दंगली घडविण्याच्या प्रयत्नात: प्रकाश आंबेडकर 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 17 जुलै 2018

सोशल मिडीयामुळे प्रत्येक नागरिकाला स्वतः चे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकार सोशल मिडीयावर नियंत्रण आणून एक प्रकारे देशात अघोषित आणीबाणी आणण्याचा  प्रयत्न करीत आहेत.

नांदेड : येणाऱ्या काळात देशात पुन्हा भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची सत्ता आल्यास संविधान बदलविण्याची भिती वाटत असून त्यासाठी त्यांना सत्तेपासून थांबविणे आवश्‍यक आहे. देशात व राज्यात दंगली घडविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघात अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पंढरपूर येथे धनगर समाजाचा मेळावा व त्यानंतर पुणे येथे झालेला भटक्यांचा मेळावा ही देशातील परिवर्तनाची नांदी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वंचीत बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली. या आघाडीच्या माध्यमातून तमाम वंचितांची आघाडी करत राजकीय वाटा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

धार्मिक व कौटूंबिक राजकिय खेळ करणाऱ्यांची आता येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत त्यांची जागा दाखवून देऊ. सत्ताधारी भाजपा  दंगली भडकाव्यात म्हणून देशात काही ठिकाणी मशिदी जाळण्यात आल्या, मात्र जनतेच्या संयमामुळे धार्मिक दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न असफल ठरला आहे.

आंबेडकर म्हणाले, की सोशल मिडीयामुळे प्रत्येक नागरिकाला स्वतः चे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकार सोशल मिडीयावर नियंत्रण आणून एक प्रकारे देशात अघोषित आणीबाणी आणण्याचा  प्रयत्न करीत आहेत. निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले की आम्ही काँग्रेससोबत युती करण्यास तयार असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करायला तयार नाही. या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरही त्यांनी कडाडून टीका केली. यावेळी डॉ. यशपाल भिंगे, माजी आमदार हरीभाऊ भदे, विजय मोरे आणि नागोराव शेंडगे यांची उपस्थिती होती. 

Web Title: Prakash Ambedkar criticize BJP RSS