काँग्रेस-राष्ट्रवादीला आता प्रकाश आंबेडकरांचा मोठा दणका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. त्यावरही आंबेडकरांनी काँग्रेसकडून खुलासा मागवलाय. जोपर्यंत काँग्रेस  खुलासा देत पुरावे देत नाही तोपर्यंत चर्चा करणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

मुंबई : आऊटगोईंगमुळे धक्क्यांवर धक्के बसत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी आज आपली भूमिका जाहीर करत काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस फक्त चर्चेचा प्रस्ताव देते चर्चा मात्र करत नाही. त्यामुळे चर्चा करायची की नाही हे त्यांनी आधी ठरवावं असा इशारा आंबेडकरांनी दिला.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. त्यावरही आंबेडकरांनी काँग्रेसकडून खुलासा मागवलाय. जोपर्यंत काँग्रेस  खुलासा देत पुरावे देत नाही तोपर्यंत चर्चा करणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर काँग्रेसने वचिंत आघाडीसोबत पुन्हा चर्चेचा प्रस्ताव दिलाय. लोकसभेत 8 ते 10 जागांवर वंचितमुळे फटका बसल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. मात्र वंचितने ज्या अटी घातल्या होत्या त्या काँग्रेसला मान्य करणं शक्यच नव्हतं. लोकसभेसाठी तब्बल 22 जागा देण्याची मागणी वंचितने केली होती. आघाडी फिस्कटल्याने त्याचा फायदा भाजपला झाला.

आता विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने केलेल्या राजकीय आरोपांवर प्रकाश आंबेडकरांनी उत्तर मागीतलंय. तर आंबेडकरांनी या आधीच 40 जागांचा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. या दोनही अटी काँग्रेस मान्य करण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही आघाडी होण्याची कुठलीही चिन्ह दिसत नाहीत असा अंदाज व्यक्त केला जातोय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash ambedkar criticized congress on election issue