'भाजप-शिवसेनेचे भांडण प्रियकर-प्रेयसीचे, 'डिव्होर्स'नाही' 

Shiv Sena, BJP
Shiv Sena, BJP

नाशिक : भाजप-शिवसेनेच्या भांडणाला काही जण नवरा-बायकोचे भांडण म्हणतात. पण हे भांडण प्रियकर अन्‌ प्रेयसीमधील असल्याने त्यांच्यात "डिव्होर्स' होणार नाही, अशी घणाघाती टीका भारिप-बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (ता. 13) येथे केली. आंबेडकरी चळवळीची भूमी असलेल्या नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या अधिवेशनात ते बोलत होते. 

महाराष्ट्रात 159 कुटुंबांची सत्ता असून, नात्यागोत्याचे राजकारण सुरू आहे. मराठा समाजातील मावळ्यांना सत्तेत स्थान नाही. म्हणूनच राज्यातील आत्महत्या रोखण्यासह शेतीचे प्रश्‍न सुटण्यासाठी मराठा समाजातील गरीब माणसाने धनगर, माळी, कैकाडी, कुंभार, लोणार, नाभिक अशा वंचितांच्या फौजेत सामील व्हावे, अशी आर्त हाक ऍड. आंबेडकर यांनी दिली. तसेच "एमआयएम' सोबत असल्याने कॉंग्रेस युती करत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी मुस्लिम समाजाची मते चालतात पण मुस्लिमांचा नेता चालत नाही, अशी टीका केली. ते म्हणाले, की मागतकरी सरकार असल्याने दुष्काळी परिस्थितीत जनतेला मदत केली जात नाही. म्हणूनच उपेक्षित असलेले सरकार सत्तेतून बाहेर काढावे लागेल. लोकशाही टिकविण्यासाठी वंचितांना प्रतिनिधित्व द्यावे लागेल. 
 
भाजप देशाच्या सुरक्षेशी खेळतोय 
मध्यमवर्गीयांना हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्राच्या नादात देशाला बुडवू नका, असे आवाहन करत ऍड. आंबेडकर यांनी "राफेल'च्या मुद्‌द्‌यावर भाजपला घेरले. भाजप देशाच्या सुरक्षेशी खेळत आहे, असा आरोप केला. वापरण्याच्या स्थितीत सुरक्षाविषयक विमान दिले जाईल याची शाश्‍वती फ्रान्सने दिली नाही याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. अमेरिकेच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेबिटकार्ड, क्रेडिटकार्ड कंपन्यांसमवेत केलेल्या कराराला नोटाबंदी हे कारण असून, आता दोन हजार रुपयांच्या नोटा कमी छापणार आहे, असे सरकार म्हणते आहे, असे सांगून ते म्हणाले, की राज्यघटनेने रोखीने की प्लॅस्टिक कार्डने व्यवहार करायचा अधिकार दिला आहे. मग जबरदस्ती का, हा खरा प्रश्‍न आहे. आता कंपन्यांनी पंतप्रधानांना "ब्लॅकमेल' करायला सुरवात केली आहे. अगोदर सरकारने जनतेला "ब्लॅकमेल' करण्याचे हत्यार वापरले आणि आता जगातील कंपन्या पंतप्रधानांना "ब्लॅकमेल' करू लागल्याने "ब्लॅकमेल' होणाऱ्या सरकारला हद्दपार करावे लागेल. 

"ऍड. आंबेडकर मोठे बंधू' 
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या अनुपस्थितीत आमदार इम्तियाज जलील यांनी ऍड. आंबेडकर आमचे मोठे बंधू असल्याचे स्पष्ट केले. बहुजन, दलित, मुस्लिम यांना एकत्र आणण्याचे काम ऍड. आंबेडकर यांनी केले असताना वंचित बहुजन आघाडीला कमकुवत करण्याचे कारस्थान चालल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्यातील दलालांनी आपल्याला विभक्त करण्याचा प्रयत्न केला, असे सांगत आता मात्र ऍड. आंबेडकर सांगतील ते ऐकले जाईल, असे स्पष्ट केले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजपवर त्यांनी टीका केली. 

ऍड. आंबेडकर म्हणाले... 
दंगल, शहरी नक्षलवाद, कोरेगाव भीमा, "ट्रिपल तलाक' यापाठोपाठ आता सवर्णांना दहा टक्के आरक्षण असे सरकारचे "गेम प्लान' राहिलेत. पण सारे फासे सरकारच्या विरोधात पडलेत. त्यावरून सरकारची अवस्था "आ बैल मुझे मार' अशी झालीय. 
स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारे हे पहिले सरकार आहे. आता "गेम' भाजपचा होणार असून, हा पक्ष बेदखल होईल. बँक बुडाल्यावर ठेवीदारांना त्यांचे पैसे देता यावेत म्हणून रिझर्व्ह बॅंकेची गंगाजळी आहे. त्याला हात लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जीएसटी आणि नोटाबंदीतून अर्थव्यवस्था बिघडली असून, 24 लाख कोटी खर्च, तर 18 लाख जमा अशा स्थितीत सहा लाख कोटींचा खड्डा भरून काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडे पैसे मागण्यात आले. 

छगन भुजबळांना निमंत्रण 
लक्ष्मण माने यांनी ऍड. आंबेडकर यांना मुख्यमंत्री करायचे असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभेसाठी 12, तर विधानसभेसाठी 25 जागा वंचितांना देण्यात येतील, असे स्पष्ट केले. प्रा. किसन चव्हाण यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ऍड. आंबेडकर यांच्यासोबत येण्याचे निमंत्रण दिले. शत्रूच्या गोटात राहू नका आणि तुम्ही उभे राहिल्यावर "वाजवा टाळी अन्‌ हटवा माळी' अशी चर्चा होईल, असेही सांगायला ते विसरले नाहीत. लोकशाही तुडविण्याचे काम चालले असल्याने ही दुसरी आणीबाणी असल्याची टीका किशोर ढमाले यांनी केली. आमदार बळिराम शिरसकर यांनी बेरोजगारी आणि गमवाव्या लागलेल्या नोकऱ्या याकडे लक्ष वेधले. किन्नर समाजाच्या प्रतिनिधी दिशा पिंकी शेख यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा नामोल्लेख न करता "चोराळ्या करणारे साहेब नाहीत, तर एकच साहेब बाबासाहेब' असे सांगताच, उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या. अमित भुईगळ, जावेद मुन्शी, माजी आमदार हरिभाऊ भदे, नवनाथ पडळकर, ऍड. झुंजार आव्हाड, ज्ञानेश्‍वर ढेपले, संदीप कांबळे, चेतन गांगुर्डे, डॉ. संजय जाधव, संजय दोंदे, प्रा. अशोक दुर्दुले, भिवानंद काळे आदींची भाषणे झाली. प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे उपस्थित होते. पवन पवार यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com