घुबडांना प्रकाश कसा सहन होईल? 

प्रकाश पाटील 
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील साखर संकुलात झालेली भेट. उभयंतानी एकमेकांवर उधळलेली स्तुतिसुमने. सार्वजनिक जीवनात दिलेल्या योगदानाचा मुक्तकंठाने केलेला गौरव.

नरेंद्र मोदी आणि शरद पवारांविषयी विकृतपणे कंड्या पिकविणाऱ्याची फौज काही कमी नाही.

या फौजेला अंधारच बरा वाटतो. त्यांना प्रकाश सहन होत नाही. म्हणून या दोन्ही नेत्यांनी जेव्हा राजकारण करायचे तेव्हा करावे. मात्र ज्यावेळी लोकहिताचा, देशाचा प्रश्‍न येईल तेव्हा एकदा नव्हे हजारदा एका व्यासपीठावर यावे. घुबडांचा विचार करता कामा नये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील साखर संकुलात झालेली भेट. उभयंतानी एकमेकांवर उधळलेली स्तुतिसुमने. सार्वजनिक जीवनात दिलेल्या योगदानाचा मुक्तकंठाने केलेला गौरव. हे सर्व काही नवे नाही. यापूर्वी हे दोन दिग्गज नेते एका व्यासपीठावर आले होते आणि हाच अनुभव राज्यातील जनतेने घेतला. काल-परवा पुण्यात त्याचा दुसरा किंवा तिसरा प्रयोग झाला. एकमेकांचे कौतुक केल्याने राज्यातील पवार-मोदी विरोधक असलेल्या घुबडाना प्रकाशच सहन झाला नाही. ही घुबडे अंधारातच राहू पाहत आहे. हा त्यांचा दोष नाही. त्यांना फक्त विरोधाला विरोधच हवा. समाजातील चांगल्या गोष्टीसाठी किंवा लोककल्याणासाठी दोन भिन्न मतांच्या व्यक्ती एकत्र आल्या. चांगल्या गोष्टीवर दोन शब्द बोलले तर राष्ट्राची फार मोठी हानी होणार आहे ? 

वास्तविक, हे दोन नेते कोणत्या व्यासपीठावर होते हे ही लक्षात घेतले जात नाही. याचंच आश्‍चर्य वाटते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय ऊस परिषदेत ते एकत्र आले. दादांनी सहकार क्षेत्रात आणि गोरगरीब, कष्टकरी समाजासाठी दिलेल्या योगदानाचे महत्त्व या दोन्ही नेत्यांना ज्ञात आहे. वसंतदादा आणि शरद पवार यांचे राजकीय मतभेद होते हे जगजाहीर होते. ते लपविण्याचे काही कारणही नाही. मात्र दादांनी सहकारक्षेत्रात केलेले काम मैलाचा दगड आहे. वसंतदादांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त हे दोघे एकत्र आले तर काय बिघडले. मोदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व्यासपीठावर किंवा पवार हे भाजपच्या व्यासपीठावर असते तर समजण्यासारखे आहे. मात्र पुण्यातील त्या व्यासपीठावर सर्वच पक्षाचे नेते होते. मग या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे कौतुक केले म्हणून बिघडले कुठे ? विरोधी पक्षात आहे म्हणून प्रत्येक वेळी सरकारवर टीका केलीच पाहिजे का ? आपल्याकडे विरोधाला विरोध करण्याची परंपरा जुनी आहे. हा असाध्य रोग लवकर बरा होईल असे वाटत नाही. विरोधकांचेही मोठ्या मनाने कौतुक किंवा गोडवे गाण्याची सत्ताधाऱ्यांचेही मन मोठे असावे लागते हे ही तितकं खरं ! यापूर्वी विधानसभेत किंवा जाहीरसभेत विरोधकांनी केलेल्या टीकेची दखल घेतलेले सत्ताधारी नेते राज्याने पाहिले आहेत. 

शरद पवारांनी जेव्हा मोदींवर टीका करायची तेव्हा केली. मोदींनीही त्यांना सोडले नाही. पण उठसूट टीकाच करीत राहण्यात काय अर्थ. जेथे सरकार चुकते आहे. तेथे सरकारला दिशा दाखविण्याबरोबरच प्रहार करण्याची शक्ती विरोधकांमध्ये हवी. की पोरकट राहुल गांधीप्रमाणे शरद पवारांनी मोदींवर टीका करावी अशी अपेक्षा आहे का ? 

दिवसेंदिवस राजकारणही संकुचित होत चालले आहे, की अशी शंका पावलोपावली येत आहे. दोस्ती करण्यात चूक काय ? आपल्याला कोणी तरी एखादा परममित्र असावा असे कोणाला हो वाटत नाही. पक्षाच्या चौकटीबाहेरही कोणीतरी मित्र असू शकतो की नाही ? की भाजपमध्ये आहे म्हणून भाजपलाच माणूस मित्र हवा. तो कोणत्याही क्षेत्रातला असू शकतो की नाही ? यापूर्वीचे राजकारणातील काही मंडळी जिवलग मित्र होतेच की ? असो. 

शरद पवार यांच्या गेल्या पन्नास वर्षाच्या संसदीय राजकारणाचे मोठ्या मनाने मोदींनी कौतुक केले. यात गैर ते काय ? किंवा मोदी ज्याप्रकारे दौरे करीत आहे. देशहिताचे निर्णय घेत आहेत त्याबद्दल दोन कौतुकाचे शब्द बोलले तर आभाळ कोसळणार आहे ? हाच प्रश्‍न आहे. 

नरेंद्र मोदी आणि शरद पवारांविषयी विकृतपणे कंड्या पिकविणाऱ्याची फौज काही कमी नाही. या फौजेला अंधारच बरा वाटतो. त्यांना प्रकाश सहन होत नाही. म्हणून या दोन्ही नेत्यांनी जेव्हा राजकारण करायचे तेव्हा करावे. मात्र ज्यावेळी लोकहिताचा, देशाचा प्रश्‍न येईल तेव्हा एकदा नव्हे हजारदा एका व्यासपीठावर यावे. घुबडांचा विचार करता कामा नये.

Web Title: Prakash Patil article about Sharad Pawar and Narendra Modi friendship