भाजपचं ठेवायचं झाकून...!

Heeraben Modi
Heeraben Modi

राहुल गांधी नोटाप्रकरणी नाटक करीत आहेत. हे एकवेळ मान्य करू. पण नोटांसाठी खुद पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री बॅंकेत पैसे बदलण्यासाठी जातात. त्याला आपण काय म्हणायचे. त्यांचे इतके वय झाले आहे, की त्यांना घरातील कोणत्याही व्यक्तीने पैसे बदलून आणून दिले असते. शेवटी राहुल हे राजकारणात आहेत हे रावसाहेब दानवे यांना कोण सांगणार ? 

देशातील नोटा बंदीचे पुराण अजून काही संपता संपेना. हा गोंधळ आणखी किती दिवस चालणार हे मायबाप सरकारलाच माहीत. सत्ताधारी कितीही दावा करीत असले की नोटाबंदीमुळे काही परिणाम झाला नाही, मात्र तसे म्हणता येणार नाही. बॅंक आणि "एटीएम'समोर पैशासाठी आजही रांगा दिसताहेत हे मान्यच करावे लागेल. नोटांबंदीचे समर्थन करणारे सत्ताधारी आणि विरोध करणारे विरोधीपक्ष जर या मुद्यावर एकत्र आले. लोकांना जो त्रास होत आहे त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर किती बरे होईल. पण, नाही आपण तसे करणार नाही. प्रत्येकाला राजकारणाची पोळी भाजून घ्यायचीय. सरकारला बदनाम करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाही. त्यामध्ये मित्रपक्ष (शिवसेना)तर आघाडीवरच. 

आता सत्ताधारी मंडळीही आपण काय बोलतो याचे भान ठेवत नाहीत. त्यांनाही कोणी आवरू शकत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अंबाजोगाईतील एका कार्यक्रमात बोलताना गांधी घराण्यावर टीका केली. ते म्हणतात,"" नोटांसाठी गांधी घराणे रांगेत उभे राहणे म्हणजे नाटक.'' 

दानवेसाहेब, राजकारण आणि नाटकाचा तसा खूप जवळचा संबंध. हे आता नव्याने सांगण्याची गरज आहे का ? नाटकातील मंडळी दोन तीन तासासाठी तरी अभिनय करीत असतील. मात्र राजकारण्यांना दररोज नव्हे तर पावलोपावली नाटक करावे लागते. नाटकीपणा हा राजकारणी मंडळींमध्ये असतोच. तो नाकारून चालणार नाही. नाटक केले नाही आणि सत्य बोलायला लागले तर त्यांना किती प्रश्‍नांना दररोज सामोरे जावे लागेल हे काही सांगता येत नाही. कधी कधी लोकांना दाखविण्यासाठी नाटक हे करावेच लागते. एखादी गोष्ट मनाला पटो किंवा न पटो त्यांना वेळ मारून नेण्यासाठी नाटक करावे लागते. निवडणुकीत दिलेली आश्‍वासने पूर्ण होत नाही. जेव्हा मतदार त्यांना आठवण करून देतात तेव्हा त्यांना वेळ मारून नेण्यासाठी नाटक हे करावे लागतेच. दिलेले आश्‍वासन कसे पाळणार आहे. प्रश्‍न कसे मार्गी लावणार आहे. हे सर्व पटवून देताना त्यांना नाटकातील अभिनेत्याप्रमाणे नाटक करावे लागतेच की ? आणखी कोणत्या गोष्टीसाठी नाटकं करावं लागते हे प्रत्येक नेत्यालाच माहीत. काहीही असो नाटकाशिवाय राजकारण नाही हे तितकंच खरं ! 

गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा नेत्याला नाटक हे करावेच लागते. हे बरीच वर्षे राजकारणातील उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या रावसाहेब दानवे यांना खरंतर सांगण्याची गरज नाही. ते म्हणतात त्याप्रमाणे राहुल गांधी नोटाप्रकरणी नाटक करीत आहेत. हे एकवेळ मान्य करू. पण नोटांसाठी खुद पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री बॅंकेत पैसे बदलण्यासाठी जातात. त्याला आपण काय म्हणायचे. त्यांचे इतके वय झाले आहे, की त्यांना घरातील कोणत्याही व्यक्तीने पैसे बदलून आणून दिले असते. शंभरच्या जवळ आलेल्या आणि खुद्द पंतप्रधानांच्या मातोश्री म्हटल्यानंतर त्यांना नोटासाठी खरंच बॅंकेत जाणे गरजेचे होते का ? हा ही प्रश्‍न आहे. बॅंकेत जाऊन त्यांनी पैसे बदलून आणणे यामध्ये देशाच्या एक नागरिक म्हणून चुकीचे असे काहीच नाही. तसेच राहुल गांधी यांनाही तोच न्याय लावावा लागेल. मग कोणी असेही म्हणेल की राहुल हे या मुद्यावर राजकारण करीत आहे. लोकशाहींने प्रत्येक नागरिकाला जे हक्क दिले आहेत त्याप्रमाणे राहुल म्हणतील, की मला पैसे हवे होते म्हणून मी रांगेत उभा राहिलो. त्यामध्ये गैर काय ? हा मुद्याही बरोबरच असणार. शेवटी ते विरोधीपक्षात आहेत त्यामुळे ते सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न जेवढा करता येईल तेवढा करणारच. राहुल या मुद्यावर नाटक करणारच आणि ते भाजप सरकारला विचारून करणार नाहीत. विरोधक त्यांच्यावर टीका करोत किंवा बरोबर म्हणोत मी लोकांबरोबर आहे आणि सरकारच्या निर्णयाचा संपूर्ण देशाला कसा त्रास होतो आहे हे सांगण्यासाठी ते नाटक करणार. 

शेवटी दानवे काय किंवा राहुलबाबा काय हे सर्वजण राजकारणातील कसलेले अभिनेते आहेत. त्यांना लोकांना कधी हसवायचे आणि कधी रडवायचे हे चांगले समजते. त्यामुळे एकमेकांच्या अभिनयाचे वाभाडे काढण्यात काहीच कारण नाही. तुम्हाला जेवढे जमेल तेवढे नाटक करीत राहा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com