महाराष्ट्रात लाट मोदींची की फडणवीसांची

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

कोणी काही म्हणो, महाराष्ट्रात मोदी नव्हे तर फडणवीसच लाट आहे यावर शिक्कामोर्तब करायला हवे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने नाकाने वांगी सोलण्याचे बंद करावे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झंझावात आणखी पुढील निवडणुकीपर्यंत कोणी रोखू शकेल असे वाटत नाही. नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी धुवाधार बॅटींग केल्याने विजयश्री खेचून आणला. त्यामुळे विरोधी पक्षांचा जळफळाट होणे साहजिक आहे. आता आमचे किती उमेदवार निवडून आले. भाजपत गेलेले सर्व नेते आणि निवडून आलेले नगरसेवक आणि नगराध्यक्षही आमचेच होते. या म्हणण्यालाही काही अर्थ नाही. ते काल काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत होते म्हणून ते आज आहेत असे कसे म्हणता येईल. हे जे गणित मांडले जात आहे ते हास्यास्पद आहे.

यापूर्वी काँग्रेस सत्तेवर असताना त्यांनीही फोडाफोडीचे राजकारण केले की नाही? मोठे मोठे नेते स्वपक्षात घेऊन विरोधकांना धक्के दिलेच आहेत. तेव्हा जर ते पक्ष म्हटले असते की नाही काँग्रेसमध्ये गेलेले नेते आमचेच आहेत. पण, यापूर्वी अशी चर्चा कधी झाली नाही. पराभव कॉंग्रेसला पचवता येत नाही हे यावरून दिसून येते. 

राज्यात शिवसेनेचा हात धरून भाजप घराघरांत पोचली. बहुजनांमध्ये भाजपला पोचविले त्याचे श्रेयही दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना द्यावे लागेल. आज मात्र मुंडे नाहीत. फडणवीस हेच राज्यात भाजपचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला वजन आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची अशी प्रतिमा निर्माण केली आहे की, त्यांच्यावर इतर पक्षातील नेतेही विश्वास ठेवू लागले आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत विरोधी पक्षातील लहान-मोठे नेते आणि कार्यकर्ते भाजपत जाण्यास का उत्सुक आहेत याचा विचार विरोधकांनी केला पाहिजे. नगरपालिका निवडणुकीत भाजपने यश मिळविल्यानंतर आता या पक्षाचे लक्ष्य जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका असणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचा विचार केल्यास मंदिरात दर्शनासाठी ज्याप्रमाणे रांगा लागतात तशा रांगा भाजपच्या कार्यालयांसमोर दिसून येत आहेत. एककाळ असा होता की भाजपला कोणी दारातही उभे करीत नव्हेत. जी मंडळी भाजप आणि संघाला जाहीर शिव्याशाप देत होती. त्यापैकी बरेच चेहरे भाजपच्या दावणीला बांधले आहेत. जे काँग्रेसला जमले नाही ते भाजप आज राज्यात करीत आहे. बीसी, ओबीसी, मराठा आदी छोट्या मोठ्या जातींमध्ये विश्वास निर्माण करून सरकार तुमच्यासाठी काहीतरी करीत आहे हे चित्र उभे करण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले आहेत. प्रत्येकाला मधाचे बोट दाखविले जात आहे. मध केव्हा चाटायला मिळायचे तेव्हा मिळेल. पण विरोधी पक्षातील नेत्यांना भाजप म्हणजे मधाचे बोट वाटते.

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा मनसेचे विद्यमान नगरसेवकच पक्षाला सोडून जात आहेत. त्या पक्षात राहिलो तर आपण आपटणार तर नाही ना? या भीतीने त्यांना ग्रासलेले दिसते. त्यामुळे भाजपत प्रवेश करून कसे तरी तिकीट मिळविण्याचा खटाटोप करताना ते दिसतात. ज्या पक्षाच्या तिकिटावर दोन तीन टर्म निवडून आले तेच पक्षाचा त्याग करीत आहेत याचे आश्‍चर्य वाटते. भाजप प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर एका ज्येष्ठ नेत्याने असा प्रश्‍न केला आहे, की आज भाजप म्हणून आम्हाला साथ देणारी मंडळी पुढील निवडणुकीत आमच्या सोबत असतील की नाही हे सांगता येत नाही. हे काहीप्रमाणात बरोबरही आहे. शेवटी आयाराम-गयारामना कोणत्याच पक्षाचे नसतात. ते म्हणतील तो त्यांचा पक्ष असतो. 

भाजपत जी इनकमिंग सुरू आहे. त्याविषयी असेही म्हणता येईल, की जे आमदार आणि नगरसेवक भाजपत येत आहेत त्यांची त्या मतदारसंघात ताकद असते. मतदारसंघाची बांधणी केलेली असते. दहा पंधरावर्षे काम केलेले असते. विविध उपक्रम राबविलेले असतात. त्यामुळे ते लोकांपुढे असतात. मतदारही आपले काम होते ना मग तो कोणत्या पक्षात जातो याचा विचार करीत नाही. त्यामुळे आज भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला तरी पुढे आयुष्यभर मी खाली ठेवणार नाही अशी शपथ एका तरी आयारामने घेतली आहे ? उद्या जर काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा शिवसेनेने बाजी मारली तर त्यांच्याकडेही रांग लागेल. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याच मुद्यावर नेमके बोट ठेवतानाच भाजपवर टीका केली. ते म्हणतात,"भाजपमध्ये जे निवडून आले आहेत. ते भाजपचे कुठे आहेत. आयारामच विजयी झाले आहेत.'' काही अंशी यामध्ये तथ्य असले तरी शेवटी विजय तो विजयच असतो. आज जे कोणी भाजपमध्ये आहेत त्यांच्यावर कमळाचा शिक्का आहेच ना? त्यामुळे भाजपचा विजय सर्वांनीच मान्य करायला हवा. मोदी सरकारविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी कितीतरी कळीचे मुद्दे आहेत विरोधकांना त्याचे श्रेय घेता येत नाही. सत्तेच्या बाजूने असलेले स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच सरकारवर आसूड ओडत आहेत. जे त्यांना जमते ते दोन्ही काँग्रेसला जमत नाही. त्यामुळे भाजपच्या विजयाचा आनंद दोन्ही काँग्रेसने साजरा करायला हवा. उगाच नाकाने वांगी सोलू नयेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com