ब्राह्मण-ब्राह्मणेतर 'वाद' जाळून टाका! 

prakash patil write about shetkari kamgar paksh
prakash patil write about shetkari kamgar paksh

संघ, भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांना शिंगावर घ्या मात्र शेकापकडे काहीतरी व्हीजन असावे. स्वत: काही तरी वेगळे करून दाखविण्याची धमक दाखवावी. लोकांपुढे आदर्श निर्माण करावा. केवळ ब्राह्मण द्वेषाच्या राजकारणाने हाती काहीच लागणार नाही. 

शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पुण्यातील शनिवारवाड्यावर आयोजित केलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात नेत्यांची उत्स्फूर्त भाषणे ऐकण्याची संधी पुन्हा मिळाली. शेकापची ओळख केवळ एक-दोन जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली आहे. आता या जुन्या पक्षाला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी रणशिंग फुंकण्यात आले. 

एकेकाळी शेतकरी आणि कामगारांसाठी मोठे लढे उभारणारा हा पक्ष संपला असे बोलले जात होते. परंतु हा पक्ष संपलेला नाही असे म्हणता येईल, असो. वास्तविक प्रत्येक पक्ष स्थापन होताना एक तत्त्व घेऊनच जन्माला येतो. तसा शेकापचा बेस शेतकरी आणि कामगार हाच राहिला. या पक्षाने पूर्वी अनेक लढे उभारून काँग्रेस राजवटीत दबदबा निर्माण केला होता. शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, केशवराव धोंडगे आदी नेत्यांनीही एक काळ गाजविला. आक्रमकतेबरोबरच सखोल अभ्यास आणि गरीबांबाबतची तळमळ या नेत्यांच्या भाषणात दिसून येत असे. काही वर्षापूर्वी या पक्षाचे नेते ब्राह्मण्यवादावरही तुटून पडत असत. ती त्या काळाची गरज होती. आता मात्र परिस्थिती बदलली असली तरी ब्राह्मण्यवादाचा राग परवाच्या सभेतही आळवला गेला. बहुजनवादाचा पुरस्कार करताना ब्राह्मण, संघ, भाजप तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेलाही त्यांनी सोडले नाही. म्हणजेच एकाचवेळी सर्वांना शिंगावर घेतले. मात्र फोकस होता तो ब्राह्मण, भाजप आणि संघ. संभाजी ब्रिगेड जी भाषा करते. किंवा जे तत्त्व मांडते तोच ठेका श्रीमंत कोकाटेसह प्रवीण गायकवाड यांनी पुन्हा एकदा शनिवारवाड्यावर धरला. 

'ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर"वाद' जाळून टाकता आला तर. द्वेष शिकविणारा हा वाद आणखी किती वर्षे सुरू राहणार आहे. तसेच हा वाद जिवंत ठेवण्यासाठी आगीत आणखी किती वर्षे तेल ओतत राहायचे हा प्रश्‍नही यानिमित्ताने पुढे येतो. 

दैनंदिन जीवनात आपण नाही म्हटले तरी कुठे जात पाहून व्यवहार करीत असतो. नोकरी असो किंवा उद्योग-व्यवसाय. तेथे प्रत्येक जातीधर्माचे लोक असतात त्यांच्याकडे पाहून आपण व्यवहार करतो का? पण, पक्ष आणि राजकारण आले की आपण जातीवादावर बोलतो. एकमेकांचा तिरस्कार करतो. एकीकडे आपण प्रगत जगात नांदत असताना दुसरीकडे मात्र जातींकडे पाहत संकुचित होत जातो. सर्व जातीधर्मांकडे उदारमनाने पाहण्याची आपली दृष्टी केव्हा बदलणार? 

ब्राह्मण -ब्राहमणेत्तराचा वाद अनेक पिढ्या मराठी मुलखात चालत आला. इतिहासातील पाने उलगडून पुन्हा पुन्हा वाद निर्माण होत आहे. इतिहासात काही चुकले असेल तर मन मोठे करून मान्यही केले पाहिजे. एखाद्या महान लेखकाने लिहिलेले सर्वच बरोबर असे काही म्हणता येत नाही. पण, चुकले असेल तर आपण चूक सुधारू या असे कोणीच म्हणत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा जात पुढे येतेच. संकुचितपणा वाढीस लागत आहे. खरेतर आजच्या नव्या पिढीला अशा वादात खूप रस आहे असे दिसत नाही. त्याच्या मस्तकात जातिवादाचे विष आपण पेरत असतो. संघ परिवारातील मंडळीही गांधीद्वेष अजून किती वर्षे सुरू ठेवणार. बहुजनवादी लोक आणखी किती वर्षे ब्राह्मणद्वेष करीत राहणार. आपल्या मनातील द्वेषाचे हे विष जाळण्यासाठी तरुणांनीच पुढाकार घ्यायला हवा. 

खरंतर आजच्या जागतिकीकरणात शेतीचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. शेती उद्‌ध्वस्त झाली आहे. कृषिक्षेत्रात नवनवीन प्रयोग होत असले सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचत नाही. दर्जेदार बियाणे मिळत नाहीत. बॅंका शेतकऱ्याची अडवणूक करीत आहे. सावकार नाडत आहेत तर मायबाप सरकारही शेतकऱ्यांविषयी हात आखडता घेत आहे. शेतीचे तुकडे पडत आहेत. दुष्काळ, गारपिटीने दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहे. बळीराजाला कोणी वाली आहे की नाही? शेतकरी म्हटले की लग्नासाठी पोरगीही देत नाही. शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणाऱ्या, रस्त्यावर उतरणाऱ्या संघटना सरकारच्या सावलीत आहेत. संघटनेच्या नेत्यांना आता ऊन सहन होत नाही. एसीत बसून अधूनमधून डरकाळ्या फोडल्या जात आहेत. असे ऐकना अनेक प्रश्‍न आहेत. खरेतर शेतकऱ्याच्या मागे मोठी ताकद निर्माण करण्याची गरज आहे. गटशेतीसारखे प्रयोग करण्याबरोबरच कौशल्य प्रशिक्षणाची जोडही दिली पाहिजे. हमीभावासाठी आग्रह धरला पाहिजे. शेतीही सुखाची राहिली नाही. याचा विचार शेकापने करावा. ज्यावेळी शेकापची स्थापना झाली त्यावेळचे प्रश्‍न वेगळे होते. ब्राह्मण्यगिरीमुळे शेतकरी गाडला जात होता. त्याच्या भोळेपणाचा फायदा घेतला जात होता. त्यावेळी शेकापने ब्राह्मणेतर चळवळीला बळकटी दिली ही त्याकाळची गरज होती. पन्नास साठ वर्षांपूर्वीचे प्रश्‍न आज राहिले नाहीत. शेकापच्या व्यासपीठावर हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्याची गरज असताना ब्राह्मणद्वेषाचे विष का पेरले जात आहे. त्यातून हाती काहीच लागणार नाही.

मुळात गावात आता किती ब्राह्मणांची घरे राहिली याचाही विचार व्हावा. खेड्यात नव्हे तर तो शहरात किंवा अमेरिकेत स्थायिक झाला. त्यामुळे त्यांच्याविरोधात गरळ ओकून काहीच साध्य होणार नाही. उलट सर्वसमावेशक राजकारण केल्यास पक्षाला उज्ज्वल भविष्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com