कुणब्याच्या पोरा असंच लढत जा, सरकारला वाकवत जा !

सोमवार, 12 जून 2017

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने संघर्ष यात्रा, स्वाभिमानीची आत्मक्‍लेश यात्रा, भाजपची संवाद यात्रा आणि शिवसेनेची शिवसंवाद यात्रा निघाली. सर्वच पक्ष आणि संघटना कधी नव्हे त्या शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्याने कुणब्यांच्या पोरांत हत्तीचं बळं आलं.

कोणत्याही आंदोलनातून नवीन नेतृत्व लोकांच्या समोर येते. उदयास येत असते. नव्या नेतृत्वाची नव्याने उदयास येत असलेल्या नेत्यांची भाषा आधिच्या नेतृत्वापेक्षा अधिक आक्रमक आणि टोकाची असते. परंतु शेतकरी संपाच्या आंदोलनाचे वैशिष्ठ्य पुणतांबा येथून सुरू झालेले आणि राज्यभर पसरलेले हे आंदोलन होते.जुन्याजाणत्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांना बरोबर घेऊनच नव्या नेतृत्वाने कुणब्याच्या पोरांनी एकजुटीने थेट सरकारला वाकले आणि आपल्या मागण्या पदरात पाडून घेतल्या आहेत. एकीकडे सरकारचे अभिनंदन करतानाच नव्या दमाच्या नेतृत्वाचे स्वागत करायला हवे 

देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासात शेतकरी संपाची नोंद सुवर्णअक्षरांनी नोंदविली जाईल. आतापर्यंत कामगारांचे संप महाराष्ट्राने पाहिले आणि अनुभवले. मात्र शेतकरी संप कधी कोणी पाहिला नव्हता. अनुभवायचा तर प्रश्‍न नव्हता. गेल्या काही वर्षात शेतीची माती झाली. कधी नव्हे तो शेतकरी देशोधडीला लागला. कर्जाच्या बोज्याने दररोज शेतकरी आपले जीवन संपवितो आहे. 2001 ते 2017 पर्यंत दहा ते अकरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. निसर्गाची साथ मिळत नसल्याने तो हतबल आहे. तर पिकविलेल्या मालाला योग्य दाम मिळत नसल्याने जगण्यामरण्याची लढाई तो लढतो आहे. 

या लढाईतून बाहेर पडण्यासाठी त्याचा आक्रोश सुरू आहे. मदतीसाठी सरकारला हात जोडून विनंती करीत होता. मात्र सरकार मदतीचा हात पुढे करीत नव्हते. जेंव्हा तो पेटून उठला. तेंव्हा सरकार खडबडून जागे झाले. नमले. शेवटी सरसकट माफी देण्याची तयारीही दाखविली. आज जे केले ते यापूर्वीच केले असते तर. आजचा शहाणपणा पूर्वीच दाखविला असता तर. महाराष्ट्राला हा तमाशा पहावा लागला नसता. तरी ही ठीक. "देर से आये, दुरूस्त आये' असे म्हणावे लागेल. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने संघर्ष यात्रा, स्वाभिमानीची आत्मक्‍लेश यात्रा, भाजपची संवाद यात्रा आणि शिवसेनेची शिवसंवाद यात्रा निघाली. सर्वच पक्ष आणि संघटना कधी नव्हे त्या शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्याने कुणब्यांच्या पोरांत हत्तीचं बळं आलं. सरकारशी सरसरळ दोन हात केल्याने संघर्ष चिघळत गेला. खरेतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांना देण्याच्या बाजूचे नव्हते असे नाही. पण, त्यांना सल्ला देणारे आणि संप मोडून काढण्यास निघालेल्या मंडळीमुळे हे प्रकरण चांगलेच अंगलट आले. राज्यातील मोठ्या संख्येने लोक शेतकऱ्यांविषयी सहानुभूती दाखवित आहेत हे त्यांच्या लक्षातच आले नाही. 

शेतकरी संप त्यानंतरचे राजकारण याविषयी पुन्हा तेच मुद्दे येथे मांडण्याऐवजी आज जे काही निर्णय झाले त्याचे स्वागत केले पाहिजे. रस्त्यावर उतरून कुणब्याची पोरं लढली याचेच सर्वाधिक समाधान आहे. महाराष्ट्रात आज 35 च्यावर शेतकरी संघटना आहेत. म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यात एक असे समजायला काही हरकत नाही. या सर्व संघटना एकत्र येतात. त्यांच्या नेत्यांची वज्रमुठ होते. जुन्या नेत्याबरोबरच अजित नवले, धनंजय थोर्डे आदी सारख्या नव्या नेतृत्वाने परिपक्तवतेची आणि मुत्सदेपणाची भूमिका घेतली. नव्या नेतृत्वाने मातबर नेत्यांचे नेतृत्व मान्य केले. फडणवीस सरकारने आंदोलकांमध्ये फूट पाडून आंदोलकांचा विचका करण्याचा प्रयत्न केला. पण, नव्या नेतृत्वाने आंदोलनाचा विचका होऊ दिला नाही. फूट पडू दिली नाही. मात्र दबाव कायम ठेवला. आक्रमक्तेबरोबर परिपक्तवतता यांचा संगम या पिढीत दिसून आला. कुठेही आक्रस्ताळेपणा दिसून आला नाही हे नव्या नेतृत्वाचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल. 

सरकारनं सरसकट कर्जमाफीला निकषासहीत मंजुरी दिली. अल्पभुधारकांची व मध्यभुधारकांना कर्जमाफी आजपासून झाली. त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती खुद्द सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच दिली. त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवून बळिराजा निवांत झाला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व गोंधळात शांत होते. सरकरी यंत्रणेकडून कोणताही अन्याय होऊ दिला नाही. अन्यथा महाराष्ट्रही मध्यप्रदेशच्या वाटेवर गेला असता. आंदोलनादरम्यान थोडी जाळपोळ झाली. मात्र उद्रेक झाला नाही याचे श्रेयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शेतकरी नेत्यांना द्यायला हवे. आंदोलनादरम्यान सरसकारने बळाचा वापर केला नाही. सरकारची पहिली खेळी चूकली तरी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढे बिनचूक खेळी केली आणि संप मिटविण्यासाठी डावपेच लढले. सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी चर्चेसाठी आले आणि प्रश्‍न मार्गी लागला. 

सात जूनपासून मॉन्सून सुरू होतो. त्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतातील मशागती करतो. पावसाला सुरवात झाली की पेरणी करतो आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी व्याकूळ झालेला बळिराजा पंढरीच्या वाटेला लागतो. आषाढी वारीत ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष करीत तल्लीन होतो. यावर्षी मात्र तो थोडा चिंतेत होता. शेतकरी संप सुरू होता. संप मिटणार का नाही ? हा प्रश्‍न होता. कर्जमाफी होणार की नाही ? पिककर्ज मिळणार की नाही ? ही विंवचणा होती. पण, पंढरीच्या विठ्ठलांने सरकारलाही सुबुद्धी दिली आणि सगळंच चांगलं झालं. 

राज्यावर आज जे ढग येत आहेत. ते पाण्याने भरलेले आहेत. ते कोसळणार. बरसणार. शिवार हिरवंगार होणार. कर्जमाफ झालं. नवीन कर्ज मिळतंय, शिवार फुलतंय यापेक्षा बळिराजाची आणखी काय अपेक्षा असू शकते. 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
पाक सैन्याकडून 1 जूनपासून नवव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन
विजय मल्ल्यांची 'चोर, चोर' म्हणत उडविली हुर्यो​
बीड: बिंदुसरेवरील पर्यायी रस्ताही गेला वाहून
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता
#स्पर्धापरीक्षा - 'उडान योजना'​
पुण्यातील ‘ग्रॅंड’ गणेशोत्सव पर्यटनाचा ‘ब्रॅंड’ व्हावा!​
‘राहुल चमू’समोर मोठे आव्हान​
स्वामिनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी​

(राजकीय घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा)

Web Title: Prakash Patil writes about Farmers Strike