राणेसाहेब 'महा'मंत्री व्हावेत ही तर अकरा कोटी जनतेची इच्छा!

Narayan rane
Narayan rane

देवेंद्र फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. या वर्षाचा लेखाजोखा मांडला तर गेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारपेक्षा या नेत्रदीपक कामगिरी केली नसली तरी नक्कीच समाधान आहे. शेवटी कोणतेही सरकार आले तरी ते काही जादूची कांडी घेऊन येत नाहीत. त्यामुळे उणेअधिक होत असते. खुद्द मुख्यमंत्र्यांवर कोणताही भ्रष्टाचार किंवा गंभीर आरोप झालेला नाही. याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. वादातीत मुख्यमंत्री म्हणून त्यांची इमेज बनली आहे.

या तीन वर्षाकडे दृष्टीक्षेप टाकला तर असे लक्षात येईल की शिवसेना या वर्षात महाराष्ट्राच्या हितावर बोलण्याऐवजी फक्त टीका करीत राहिली. ते ही सत्तेत राहून. गेल्या काही महिन्यापासून तर या दोन्ही पक्षातील दरी वाढताना दिसत आहे. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावरून तर शिवसेना अधिक आक्रमक झालेली दिसून येते. वास्तविक, राणे यांना मंत्री म्हणून पाहण्यासाठी राज्यातील अकरा कोटी जनता आतूर झाली आहे. तो एैतिहासिक क्षण जनतेला याच देही याच डोळ्याने अनुभवायचा आहे. त्यामुळे राणेंचा प्रवेश जितका लवकर होईल तितका मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. मंत्री कोणाला करायचे हे काय शिवसेना ठरविणार का ? असा सवाल खुद्द राणेंचे तडफदार, कर्तृत्वान पूत्र आणि आमदार नितेश राणेंनी केला आहे. माझे बाबा मंत्री होणार आणि त्यांना चांगले खाते मिळणार असेही त्यांचे म्हणणे आहे. 

मुख्यमंत्री असलेले नारायण राणे हे फडणवीस यांच्या हाताखाली मंत्री होणार आहेत. म्हणजे दुसरे शिवाजीराव निलेंगकरच. तेही होते की मुख्यमंत्री. पुढे ते राणे यांच्याप्रमाणे महसूल मंत्री बनले होते. इतक्‍या मोठ्या माणसाला मुख्यमंत्री का बरे मंत्री करण्यास इतका उशीर करीत आहेत. हेच कळत नाही. सरकारला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. जनता मुख्यमंत्र्यांच्या कामावर खूश आहे. पुढील दोन वर्षात जी म्हणून महत्त्वाची कामे शिल्लक आहेत त्यासाठी वजनदार नेते मंत्रिमंडळात हवेत की नको ! 

राणेसाहेब मंत्री झाले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्या तातडीने थांबतील. मराठा समाजाच्या आरक्षणासह सर्वच मागण्या चुटकीसरशी सुटतील. एसटी कर्मचाऱ्यांना संप करावा लागणार नाही. लाखो तरूणांच्या हाताला काम मिळेल अशा ज्या म्हणून काही समस्या आहेत त्या शिल्लकच राहणार नाहीत. माझा महाराष्ट्र देशात नंबर 1 होईल. राणेंच्या मंत्री होण्याने लोकांच्या जर अपेक्षा उंचावणार असतील तर कोकणातील या गोड माणसाला का बरे ताटकळवले जात आहे. 

गेल्या काही महिन्यापासून जनता ध्यानीमनीस्वप्नी राणेंचा प्रवेशच पाहत आहेत. बरं राणे ही काही साधी असमामी नाही. त्यांचे कर्तृत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आणि अनुभवले आहे. त्यांनी राज्याला दिलेले योगदान महाराष्ट्र कदापि विसरू शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिसाहेबांनी शिवसेनेचा विचार न करता त्यांना तातडीने मंत्री करावे. शिवसेनेनेही उगाच आदळआपट करण्यापेक्षा त्यांचे स्वागत केले पाहिजे. या माणसांने इतकी वर्षे तुमच्यासाठी खर्ची केली आहेत हे तरी लक्षात घ्यायला हवे की नको. नाहीतरी ते काही भाजपमध्ये प्रवेश करीत नाही. ते स्वाभिमानी नेते आहेत. त्यांचा पक्ष वेगळा आहे. भले त्यांचे पूत्र कॉंग्रेसमध्ये असतीलही. म्हणून काय झाले. अकरा कोटी जनतेसाठी राणेसाहेबांना मंत्री करा आणि पुढील दोन वर्षे पहात राहा महाराष्ट्राकडे. तो कसा भारतवर्षात झळकलेला दिसेल. 

"ज्यांनी पक्षामध्ये आयुष्य घालवलं आणि सत्ता आणली, असे नेते पक्षाबाहेर आहेत आणि नारायण राणेंसारखे "त्यागी' नेते सत्तेमध्ये येत आहे अशी बोचरी टीका काय म्हणून नाथाभाऊ तुम्ही करीत आहात. तुमच्यात आणि त्यांच्यात काही फरक आहे की नाही नाथाभाऊ. तुम्ही पक्षात आहात तुम्ही कोठे जाणार नाहीत. राणेंसारखे नेते भाजपजवळ येत आहेत ही एैतिहासिक घटना ठरणार नाही का नाथाभाऊ ! " आपला म्हणजे बाब्या' असे नाही म्हणायचं नाथाभाऊ ! त्यांच्यासाठी तुम्ही भी थोडं मोठ मन करा की राव ! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com