शेतकऱ्यांच्या ताकदीचा शेट्टी-खोतांनीही सौदा केला? 

Raju Shetty, Sadabhau Khot
Raju Shetty, Sadabhau Khot

1989 साली शरद जोशी भाजपच्या विरोधात होते आणि 2000 साली त्यांच्याबरोबर ! शेतकरी संघटनेचा सौदा करू नका असे संघटनेतील नेत्यांचे त्यावेळी म्हणणे होते. पण, जोशींनी ऐकले नाही. ते भाजपच्या बाजूने गेले. त्यानंतर संघटनेत फूट पडली. आज राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोतही तोच कित्ता गिरवत आहे. शेतकऱ्यांच्या ताकदीचा या दोघानीही सौदा केला आहे असे म्हणावे लागेल. 

आपल्या महान राष्ट्राची लोकशाही महान. तिची जगात शान. त्याचा तुम्हा-आम्हाला खूप अभिमान. याविषयी दुमत असण्याचे कारण तरी काय? स्वातंत्र्यानंतर येथे शेकडो पक्ष जन्म आला आणि येथेच निद्रीस्तही झाले. काही आचके देत जगण्यासाठी धडपडतायत. जे जे म्हणून मोठे मासे आहेत ते लहान लहान माशांना गिळंकृत करून आपली भूक भागवित आले. तरीही मोठ्या माशाची भूक कधीच भागणार नाही. आपल्या पेक्षा कोणी मोठा होऊ नये. आपल्याला कोणी गिळंकृत करू नये यासाठी तो शिकार करीतच राहतो. 

भारतीय राजकारणातील सर्वात मोठा मासा कोण हे कळलेच असेल. 2014 पूर्वी असाच एक दुसरा मोठा मासा होता. त्याचे नाव काँग्रेस होते. पण, तो आता म्हातारा झाला. खंगला आहे. गेल्या दोन वर्षात देशातील चित्र लक्षात घेता असे दिसून येईल की जे जे प्रादेशिक पक्ष बलवान होते. त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम योजनाबद्ध सुरू आहे. ते थांबले नाही. थांबणार नाही. देशाचा विचार बाजूला सारून थोडा महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्यात आज जो मोठा मासा बनला आहे तो शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, मनसे, स्वामिमानी पक्ष आदींना गिळंकृत करू पाहतोय. साम दाम आणि दंड कशाही प्रकारे छोट्या छोट्या माशांना लक्ष्य केले जात आहे. पट्यात आले की सावज टिपायचे. संधी सोडायची नाही हेच सुरू आहे.स्वामिमानी संघटनेबाबतही नेमके तेच होत आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांचे राम-लक्ष्मण म्हणून ओळखले जातात. हे दोन्ही दिग्गज नेते आता एकमेकांपासून दुरावले. या दोघांमध्ये इतकी दरी निर्माण झाली आहे, की ती आता कदापी भरून येणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आणि पक्षातील फूटही अटळ आहे. दोन्ही नेत्यांचे शागिर्द शड्डू ठोकून मैदानात उतरतील. दोघे एकमेकांविरोधात लढतील. त्यामुळे शेतकऱ्यांची जी ताकद होती ती ही दुभंगणार. या दोघांचा कुठे तरी शेतकऱ्यांना आधार वाटत असे. एकीकडे शेतकरी देशोधडीला लागला असताना शेतकऱ्यांसाठी दोन हात करणाऱ्या आक्रमक संघटनेतच फूट पडली आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अटळ आहे. शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये वितुष्ठ यायचे कारणही सत्ताच. मंत्रिपदापुळे संघटनेची कशी वाट लागते हे आजचे ताजे उदाहरण नाही. यापूर्वी शेतकरी संघटनेचे नेते कै. शरद जोशी जेंव्हा कॉंग्रेस, भाजपसारख्या सरकारच्या सावलीत गेले तेंव्हाही संघटनेत अशीच फूट पडली. 

जोशीनी जातीयवादी भाजपच्या मांडीला मांडी लावली म्हणून राजू शेट्टींनी बंडखोरी केली. स्वाभिमानी संघटना स्थापन केली. त्यांना शेतकऱ्यांनी अक्षरश: डोक्‍यावर घेतले. मात्र त्याच शेट्टींनी शेवटी गुरूप्रमाणेच भाजपचा मार्ग स्वीकारला. याचा अर्थ असा होतो की ज्या तत्त्वासाठी स्वाभिमान जागा झाला. तो स्वाभिमान गहान टाकण्याची वेळ शेट्टींवर आली. 

शेट्टींनी सदाभाऊंना मोठे केले. त्यांना मंत्री केले. पण, त्यांचे राजकारणातील वजन शेट्टींना सहन झाले नाही. त्यांचे भाजप सरकारच्या अधिक जवळ जाणे रूचले नाही. म्हणून त्यांनी जाहीररित्या खोतांवर टीकास्त्र सोडण्यास सुरवात केली. त्यांच्या मुलाचा वाळव्यात झालेला पराभवही एक पिता म्हणून खोतांच्या जिव्हारी लागला. पक्षात घराणेशाही नको असे शेट्टींचे म्हणणे होते. अशा एक ना अनेक गोष्टींवरून खटके उडत गेले. मने दुखावली गेली. त्याचा परिणाम पक्ष फुटण्यात झाला. उद्या खोत भाजपत गेले की भाजपवाले त्यांना शेट्टींबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांच्याविरोधात झुंजायला लावतील. त्यामुळे खोतांच्या भाजप प्रवेशाने पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणितच बदलणार आहे. कोण शत्रू आणि कोण मित्र बनले हे आताच सांगता येत नाही. पत्ते अजून उघडणार आहेत. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकारणाबरोबरच दररोज भाजप सरकारला ढुसण्या देणारा असंतुष्ठ आत्मा म्हणजे शिवसेना. घटक पक्षातील आणखी नाराजमित्र त्यांना हवा होता. तो शेट्टींच्या रुपाने मिळाला. सत्तेत असलेल्या भाजपच्या बाजूने खोत तर शिवसेनेच्या बाजूने शेट्टी चालले आहेत. हे गेल्या काही घटनांवरून दिसून येते. निवडणुका वर्षसहामहिन्यावर आल्या की राजकीय भूकंप होतील. आज स्वाभिमानी फुटली असली तरी भविष्यात आणखी कोणत्या पक्षात भूकंप होणार हे यथाअवकाश पाहावे लागेल. 

राजू शेट्टी हिरोच 
स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हटली की आपल्या समोर एकच नाव येते ते म्हणजे राजू शेट्टी. शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. राज्यात काँग्रेसचे सरकार असो किंवा भाजपचे. शेट्टी हे नेहमीच लढत आले. संघर्ष करीत आहेत. लाठ्याकाठ्या खात आले. त्यांचे रक्तबंबाळ फोटो आजही आठवतात. त्यांच्या शब्दाखातर हजारो शेतकरी रस्त्यावर उतरतात. उन्हातान्हाची आणि तुरूंगाची ते चिंता करीत नाही. त्यामुळे जोपर्यंत शेट्टी आहे तोपर्यंत शेतकरी स्वाभिमानांनेच जगेल, संघर्ष करेल याविषयी शंका घेण्याचे कारण नाही. मात्र फूट पडली की शक्ती कमी पडते. 

आज महाराष्ट्रातील शेतकरी संघटना विखुरल्या आहेत. रघुनाथदादा पाटील एकीकडे, लक्ष्मण वडले दुसरीकडे, पाशा पटेल निष्क्रय. शरद जोशींच्या संघटनेचे काय चालले आहे हेच कळत नाही. आता शेट्टीनंतर लढवय्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते तेही भाजपच्या दावणीला बांधले. शेतकऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडून सत्ता उपभोगणारे कॉंग्रेसवाले असोत की भाजपवाले. त्यांना फोडाफोडीचा आनंद असतो. राज्यातील शेतकरी कधी नव्हे इतका संकटात असताना स्वाभिमानी संघटनेत फूट पडावी हे शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. 

मंत्रिपद लाभाडायला हवे
गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांसाठी ज्यांनी आयुष्यभर लढा दिला त्या लढवय्यांनी राज्यमंत्रीपद लाथाडायला हवे होते. मी प्रथम शेतकऱ्याचा मग तुमचा हा स्वाभिमान का राहिला नाही. मंत्रिपदाच्या एका तुकड्यासाठी का लाचार व्हावे लागले. शेतकरी संघटनेचा कसा सौदा होतो याविषयी "साधना'च्या दिवाळी अंकात विनय हर्डिकरांनी शरद जोशींवर जो प्रदीर्घ लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की शरद जोशींनी वाजपेयी सरकारच्या कृषी टास्क फोर्सचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यानंतर तर संघटना पूर्ण संपली. 1989 साली जोशी भाजपच्या विरोधात होते आणि 2000 साली त्यांच्याबरोबर ! लोक काही इतके बावळट नाहीत असे हर्डीकरांना वाटत होते. जोशींची भेट घेऊन त्यांनी सांगितले होते की "एक कृपा करा, शेतकरी संघटनेचा सौदा करू नका. व्यक्तिशा तुम्ही हे पद घेऊ नये.' पण, जोशींनी ऐकले नाही. ते भाजपच्या बाजूने गेले. त्यानंतर संघटनेत फूट पडली. 

आज राजू शेट्टी स्वाभिमानाच्या गोष्टी करीत असले तरी त्यांनीही शरद जोशींचाच किता गिरविला. तोच कित्ता खोतही गिरवत आहे. शेतकऱ्यांच्या ताकदीचा या दोघानीही सौदा केला आहे असे म्हणावे लागेल. याच लेखात त्यांनी चंद्रशेखर यांचे उदाहरणही दिले आहे. ते म्हणतात, "" चंद्रशेखर अतिशय फटकळ. स्पष्टवत्त्का माणूस. त्यांनी तीन-चार लाखांच्या जमावासमोर शरद जोशींना सांगितले होते की तुम्ही काळजी घ्या. तुम्ही दरवेळेला व्यवस्थेशी सौदा करता. आता सौदा तुमच्याप्रमाणे होतोय, पण तुम्ही त्याला तयार आहेत हे व्यवस्थेला कळले की, एक ना एक दिवस व्यवस्था तिच्या फायद्याचा सौदा तुमच्याकडून करून घेईल. मग तुम्हाला मागे सरायला जागा राहाणार नाही. या वाक्‍याचा अर्थ त्यावेळेला शरद जोशींना कळला नाही. जो पुढे तुम्हाला खासदार करू. तुम्ही फक्त यावेळेला शेतकरी संघटनेच्या पट्ट्यामध्ये आमचा प्रचार करा,' असा भाजपने सौदा केला तेव्हा कळले. असाच सौदा 2017 मध्ये म्हणजे सध्या सुरू आहे. पण, लक्षात घेणार कोण ? 
(क्रमश:) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com