'शान बादशाहची आणि दुकान फुटाण्याचं' 

Uddhav Thackeray, Sanjay Raut
Uddhav Thackeray, Sanjay Raut

शिवसेनेत बोलणारे हाताच्या बोटावर मोजणारेच आहेत. शिवसेनेने ज्या पध्दतीने रान उठवायला हवे तसे होताना दिसत नाही. सर्वत्र शिवसेनेची फौज लढते आहे असे चित्र मात्र दिसत नाही. पक्षाच जो म्हणून काही दरारा हवा तो राहिला नाही असे म्हणता येईल का ? "शान बादशाहाची आणि दुकान फुटाण्याचं' अशी एक म्हण आहे. तसेच काहीसे शिवसेनेचे सुरू आहे का ? 

एखाद्या नवरा-बायकोचं पटत नसेल. एकत्र राहण्याची इच्छाच मेली असेल. एकमेकांच तोंडही पाहू शकत नसतील. तर नांदायचं कशाला ? सरळ कौटुंबिक न्यायालयात जावून दोघांपैकी एकाने घटस्फोटाचा अर्ज करायला हवा की नको. एकत्र राहण्यात जर खरंच आनंद मिळत नसेल तर खोटं खोटं हसून संसाराचा गाडा हाकण्यात अर्थ तो काय ? तसेच प्रत्येक गोष्टीत संताप करून काहीच हाती लागणार नाही. हे शंभर टक्के माहित असूनही का म्हणून स्वत:चा कोंडमारा करून घेतला जात आहे. घ्या ना एकदाचा निर्णय. आज ना उद्या काडीमोड घ्यायचाच आहे ना ? मग वाट कसली बघता आहात. कागदावरची युती कशासाठी केली जात आहे ? आता मात्र अति झाले हे सांगण्याचे धाडस का दाखविले जात नाही. 

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे पक्षाची बाजू रोखठोकपणे मांडत असतात. शिवसेनेत आज एकच असा नेता आहे की तो भल्याभल्यांना शिंगावर घेत आहे ते म्हणजे राऊत. पक्षप्रमुख उद्वव ठाकरे सोडले तर पक्षात कोणी आहे की नाही असा प्रश्‍न अनेकदा पडतो. शिवसेना तर दररोज भाजपशी सामना करीत आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र यामध्ये शिवसेनेला काहीच मिळाले नाही. घटक पक्षाच्या एकाही मित्राला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. जेडीयू तर नव्याने सहभागी झाला आहे. त्यामुळे लगेच काही मिळणेही शक्‍य नव्हते. 

शिवसेनेचे तसे नाही. हा पक्ष भाजपचा सर्वात जुना परममित्र आहे. आज ही दोस्ती पहिल्या सारखी राहीली नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकाच्या जिवावर उठले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तर संजय राऊत यांनी आदळआपट केली. संताप व्यक्त केला. आज "एनडीए'ची हत्या झाली असून युती फक्त कागदापुरती उरली असल्याची प्रतिक्रियाही दिली आहे. वास्तविक भाजपचे शिवसेनेसह अनेक मित्रपक्ष आहेत. त्यापैकी कोणीच प्रतिक्रिया दिली नाही. मग, शिवसेनेला तातडीने प्रतिक्रिया देतानाच संताप का अनावर झाला हे कळले नाही. जर शिवसेनेला माहित आहे, की आपल्याला ते काडीची किंमत द्यायला तयार नाहीत तर अपेक्षा ठेवण्यात काय अर्थ आहे. त्यांच्या पक्षाला केंद्रात स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे त्यांना सध्या तरी कोणाची गरज आहे असे वाटत नाही. कोणाला मंत्री करायचे आणि कोणाला नाही याचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे. त्यांच्या निर्णयावर शिवसेना का म्हणून स्वत:ला त्रास करून घेत आहे हेच कळत नाही. 

एकेकाळी तुम्हीही मोठे भाऊ होता ना ? त्यावेळी तुम्ही सांगेल तो शब्द अंतिम असायचा. तुमच्या मागे भाजपला अनेकदा फरपटत यावे लागले होते हे आज कसे काय विसरता येईल. आज तिच परिस्थिती भाजपची आहे. भाजप मोठा भाऊ बनला आहे. केंद्रात स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे ते त्यांची जी गणिते आहेत ते मांडतच राहणार. ते कोणाचीही ढवळाढवळ सहनही करणार नाही. तुम्हाला काय द्यायचे आणि किती द्यायचे हे त्यांनी ठरविलेले असणार. त्यामध्ये बदल होईल असे वाटतही नाही. गेल्या तीन वर्षात युतीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाचे संबंध मधुर राहिलेले नाहीत. संसार सुखाने सुरू नाही. दररोज भांड्याला भाडे लागते आहे. भाजपची कडवी विरोधक कॉंग्रेसही जितकी जहरी टीका करीत नसेल तितकी शिवसेना करीत आहे. लढाई या दोन्ही पक्षात सुरू आहे. 

शिवसेनेची गरज महाराष्ट्रातच 
केंद्रात मोदी सरकारमध्ये शिवसेना राहिली किंवा नाही राहिली तरी त्यांना काही फरक पडत नाही. जो काही प्रश्‍न आहे तो महाराष्ट्रापुरता. येथे फडणवीस सरकार अल्पमतात आहे, त्यामुळे त्यांना शिवसेनेचा टेकू हवा आहे. राज्यात शिवसेना जे काही बोलत आहे. लिहित आहे. टीका करीत आहे ते सहन करीत आहे. शिवसेनेच्या त्रासातून मुक्त होण्याबाबत तेही विचार करीत असावे. शिवसेनेने राज्यात कितीही आदळआपट केली तरी मोदी त्याकडे फार लक्ष देत नाहीत. त्यांना त्यांचे जे काही व्हीजन आहे ते पूर्ण करायचे आहे. शिवसेना आणि भाजपचे संबंध इतके टोकाचे आहेत की ते केव्हाही ते घटस्फोट घेऊ शकतात. पण, घटस्फोटासाठी प्रथम अर्ज कोणी करायचा हाच प्रश्‍न आहे. 

रान कोण उठविणार ! 
शिवसेनेत एकेकाळी रान उठविणारे "एक से बढकर एक' नेते होते. दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, दत्ताजी नलावडे, मनोहर जोशी, छगन भुजबळ, सुधीरभाऊ जोशी, लिलाधर डाके, मधुकर सरपोतदार, सतीश प्रधान, प्रमोद नवलकर हे नेते म्हणजे शिवसेनेच्या मुलुख मैदानी फौजा होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी महाराष्ट्र पिंजून काढत होती. रान उठवित होती. भल्या भल्यांना "सळो की पळो' करून सोडत होती. सभांचा फड गाजवित होते. एक एक नेते असे क्षेपणास्त्र काढायचे की काही विचारायला नको. ही झाली नेते मंडळी. त्यानंतरची फळी यंग ब्रिगेडची युवा नेत्यांची फळी होती. ती ही बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेली होती. तीही कुठे कमी पडली नाही. हे चित्र दहा पंधरा वर्षापूर्वी होते. ते आज राहिले नाही. पक्षात बोलणारे हाताच्या बोटावर मोजणारेच आहेत. शिवसेनेने ज्या पध्दतीने रान उठवायला हवे तसे होताना दिसत नाही. सर्वत्र शिवसेनेची फौज लढते आहे असे चित्र मात्र दिसत नाही. पक्षाच जो म्हणून काही दरारा हवा तो राहिला नाही असे म्हणता येईल का ? "शान बादशाहाची आणि दुकान फुटाण्याचं' अशी एक म्हण आहे. तसेच काहीसे शिवसेनेचे सुरू आहे का ? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com