शिवसेनेचा सत्तेतील वाटा वाढला; पण... I Election Result 2019

Shiv-Sena
Shiv-Sena

मोदी लाटेतही 2014 मध्ये 63 आमदार निवडून आणणारी शिवसेना प्रारंभी भाजपला विरोध करून विरोधी बाकावर बसली. त्याला कारणही होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाजपला स्वतःहून दिलेला पाठिंबा. हा पाठिंबा भाजपने घेतला नाही. मात्र, मोदी लाटेत युती तोडणाऱ्या भाजपवर शिवसेना रागावली होती.

वास्तविक शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती आहे, ती गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ हातात हात घालून काँग्रेसविरोधात लढली होती. हा इतिहास असला तरी, बदलत्या राजकारणात दोन्ही पक्षांत कधी नव्हे ते शहकाटशहचे राजकारण सुरू झाले. 

महाराष्ट्रात लहान भाऊ असलेला भाजप कधी मोठा झाला हे शिवसेनेलाही कळले नाही. गेल्या पाच वर्षांपासून राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री भाजपचा आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपला झंझावात प्रारंभीपासून सुरू ठेवला. ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत सर्वाधिक यश भाजपला मिळवून दिले. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाटा सिंहाचा असला तरी राज्यातील भाजपच्या यशात फडणवीस यांचाही सिंहाचा वाटा आहे, हे नाकारून चालणार नाही.

नाराज शिवसेनेला बरोबर घेऊन तिला कधी गोंजारले तर कधी वाघाच्या तोंडात हात घालण्याची भाषाही फडणवीस यांनी केली. पण, भाजपला नुकसान होणार नाही याची चाल ते खेळले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचे कटू नाते गोड केले. गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला सामोरे जातानाही शिवसेनेला बरोबर घेतले. मात्र, शिवसेनेने सबुरीचे राजकारण करीत भाजपची साथ सोडली नाही. उलट सत्तेत राहून भाजपवर प्रहार करण्याची संधी कधी सोडली नाही, त्यामुळे शिवसेनाही विरोधकांचे लक्ष्य बनत गेली.

काँग्रेस- राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेनेच विरोधीपक्षाची भूमिका बजावली; पण दुटप्पी भूमिकेमुळे लोकांना यांचे राजकारण पचनी पडले नाही, असे म्हणावे लागेल. गेल्यावेळी 63 जागा मिळविणारी शिवसेना या वेळी आणखी खाली घसरली. खरेतर ज्या वाहिन्यांनी एक्झिाट पोलचा अंदाज जाहीर केला, त्यामध्ये शिवसेनेला 80 ते 100 जागा दाखविल्या होत्या. आज जेव्हा निकाल हाती आले, तेव्हा शिवसेनेला केवळ 57 जागा मिळाल्याचे दिसून येते. म्हणजे जशी भाजप 122 जागांवरून 103 वर आली, त्याप्रमाणे शिवसेनाही घसरली. शिवसेनेची मंडळी हवेत बाण मारण्यात मग्न आहेत. आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचा ही गर्जना योग्य आहे. वास्तव मात्र तसे नाही. शिवसेनेला स्वबळावर सत्ता मिळविणे सोपे नाही. 

यावेळच्या निवडणुकीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे, की राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी या पक्षाला सामना करावा लागला. शिवसेनेचा घसरलेला आकडा हा या पक्षाच्या नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे. शिवसेनेचा सत्तेतील टक्का वाढला; पण आकडा घटला, असे चित्र राज्यासमोर गेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com